ड्रायफ्रुट फळपिक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी
महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
लातूर,दि.20(जिमाका):- जिल्हयातील शेतकऱ्यांचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2021-22 करीता महाडीबीटी संगणक प्रणालीवर ड्रॅगनफ्रुट या फळपिकाचे अर्ज घेण्यात येत आहेत. ड्रॅगनफ्रुट (कलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि ॲन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास सुपरफ्रुट असून या काळात विविध औषधी गुण आहेत. तरी लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी या फळ पिकाच्या लागवडीसाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्र्य गावसाने यांनी केले आहे.
पाण्याची टंचाई झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहेत. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेवून सन 2021-22 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. बाय 3 मी. किंवा 3 मी. बाय 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदुन खड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर कॉक्रींटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट कॉक्रीट खांबाच्या एक बाजुला एक याप्रमाणे चार बाजुला चार रोपे लावावित.
वरीलप्रमाणे ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण या बाबीकरीता अनुदान देय आहे. या करीता प्रती हेक्टरी रक्कम रु.4.00 लाख प्रकल्पमुल्य ग्राहय धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम रु.1.60 लाख अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तीसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.
तरी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, ड्रॅगनफ्रुट फळपिक लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत तालूका कृषि अधिकारी कार्यालयशी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र सहाय्यक माधव निटूरे मो.9422750401 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.