आगामी निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढविणार - अशोक हिंगे पाटील
लातूर / बहुजन वंचित आघाडी लातूर जिल्ह्याच्या वतीने शहरातील पत्रकार भवन येथे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी मार्गदर्शक अशोक हिंगे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बहुजनांना सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी बहुजन वंचित आघाडी आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. राज्यातील प्रस्थापित पक्षांनी येथील बहुजनांचा केवळ मतांसाठी वापर केला, आरक्षणासारखे गाजर दाखवायचे आणि निवडणूक जिंकल्या की त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप केले आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला १६ व मुस्लिमासाठी ५ टक्के आरक्षणाची घोषणा केली, परंतु सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, यानंतर ही मुस्लिम बांधवांच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी सरकार असमर्थता दाखवित आहे. मतांचे गाजर दाखवून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना भाजपा यांनी बहुजनांवर राज्य केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब हेच मराठा, मुस्लिम या समाजाला न्याय देऊ शकतात त्यामुळे लातूर जिल्ह्यातील तमाम गरीब मराठा आणि मुस्लिम समाजातील बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहून आरक्षणाचा लढा तीव्र करावा असे आवाहन याप्रसंगी अशोक हिंगे पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांत पक्षांची ताकद दाखवण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे असे सांगत असताना गाव तिथे शाखा, वार्ड तिथे बोर्ड ही संकल्पना राबवून पक्ष वाढीचे काम करावे बहुजन वंचित आघाडी येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पंचायत स्वबळावर आणि संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमात मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, संतोष सूर्यवंशी, मंजुताई निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे, सूत्रसंचालन सुभेदार मादळे यांनी तर आभार चक्षुपाल कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवरुद्रअप्पा बेरुळे, भरत गायकवाड, विठ्ठल खोडके, रामेश्वर हाके पाटील, सहदेव होनाळे, अविनाश गायकवाड, दिलीप कांबळे, व्यंकट सूर्यवंशी, सुजाता अजनीकर, मायाताई कांबळे यांच्यासह जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.