रुग्णवाहिका चालक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड
बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची गरज - वाकुडे
लातूर/प्रतिनिधी - जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आस्था कौशल्य विकास केंद्र व विवेकानंद रुग्णालया मार्फत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत चालणार्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातील रुग्णवाहिका चालक या प्रशिक्षण तुकडीसाठी विद्यार्थ्यी निवड कार्यक्रमाचा शुभारंभ विवेकानंद रुग्णालयात संपन्न झाला.बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे मत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी यावेळी व्यक्त केले.
वाकुडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक अनिल अंधोरीकर तर व्यासपीठावर
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, आस्था कौशल्य विकास केंद्राचे संचालक किरण भावठाणकर,आस्थाचे केंद्रप्रमुख बाळासाहेब साठे, विवेकानंद रुग्णालयाचे कार्यवाह डॉ. राधेशाम कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक राजु वाकुडे यांनी आस्था कौशल्य विकास केंद्र व विवेकानंद रुग्णालय हे नेहमी कौशल्यावर आधारीत प्रशिक्षणात पुढाकार घेतात असे प्रतिपादन केले. गरजू व बेरोजगार युवक स्वतःच्या पायावर,कौशल्यावर आधारीत प्रशिक्षणातून उभे राहतील यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरानी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.कोवीडच्या काळात आरोग्यावर आधारीत विविध कोर्सेस व त्याचे प्रशिक्षण कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल अंधोरीकर म्हणाले की,कौशल्य विकास कार्यक्रम ही काळाची गरज आहे. शासकीय स्तरावरून गरजू युवकापर्यंत कौशल्यावर आधारीत युवक निर्माण करण्यासाठी विवेकानंद रुग्णालय सातत्याने मार्गदर्शकाची भुमिका घेईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था संकुलाचे उमेश गाडे, अजय कांबळे, सुयोग जोगदंड, सुकेश सोनकांबळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल गायकवाड व आभार अनिल गायकवाड यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.