प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक पोटली,थकित पीकविमा,कर्जमुक्ती संदर्भात निर्णायक आंदोलनाची भुमिका

 


प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक 

पोटली,थकित पीकविमा,कर्जमुक्ती संदर्भात निर्णायक आंदोलनाची भुमिका



 

 लातूर/प्रतिनिधी: शेतकर्‍यांच्या विविध समस्यांसह थकीत पीकविमा,पोटली,कर्जमुक्ती,महावितरणचा अनागोंदी कारभार आदी विषयांवर निर्णायक आंदोलनाची भूमिका ठरवण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांच्या उपस्थितीत लातूर येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दि.६ जुलै रोजी ही बैठक होणार आहे.
 गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झाले परंतु पीकविमा कंपन्यांनी विविध निकष लावून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले. विमा कंपनी व कृषी विभागाशी पत्रव्यवहार करून आणि निवेदने देऊनही अद्याप विमा मिळाला नाही. लातूरसह जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची खरेदी- विक्री लिलाव पद्धतीने न करता पोटली पद्धतीने केली जाते. यासंदर्भात अनेकदा आंदोलने केली.पणन संचालकांचा दरवाजा ठोठावला पण पोटली बंद झाली नाही. अशीच अवस्था कर्जमाफीची झाली.
   आघाडी सरकारने थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तर चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती.२ लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला नाही.प्रोत्साहन अनुदान तर कोणालाही मिळालेले नाही. महावितरण कंपनीकडूनही शेतकऱ्यांना वसुलीसाठी धारेवर धरले जाते.
वीजबिलांसाठी पिळवणूक केली जाते.वास्तविक राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नावे दिलेल्या अनुदानाची सुमारे २२ हजार कोटी रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा असतानाही रोहित्र जळाल्यास ८० टक्के रक्कम भरल्याशिवाय त्याची दुरुस्ती केली जात नाही.
 या सर्व विषयावर चर्चा करून निर्णायक आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मंगळवार दि.६ जुलै रोजी लातूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
  पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट,महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सीमाताई नरोडे,राज्य कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
   थकित पीकविमा,पोटली, अर्धवट कर्जमाफी व महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात यावेळी चर्चा होणार असून संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या