जिल्हा प्रशासना कडून व नगर परिषदेचा कोरोना मृत्यूच्या आकड्यांचा खेळ - आरोग्य उपसंचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
तब्बल 485 मृत्यू आकड्याची तफावत - उस्मानाबाद जिल्ह्यात आकडेवारीत सुरुवातीपासुन घोळ
प्रतिनिधी/उस्मानाबाद, अल्ताफ शेख,
कोरोनाची आकडेवारी सध्या कमी झाली असुन कोरोनामुळे झालेल्या मृत्यूत तब्बल 485 आकड्याची तफावत असल्याचे समोर आले आहे. लातूर आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले यांनी याप्रकरणी आरोग्य विभागास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत सुरुवातीपासुन घोळ पाहायला मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी व नगर परिषदेने केलेले अंत्यसंस्कार याची आकडेवारी कुठेच जुळली नाही.
कोरोना पोर्टलवरील उस्मानाबाद जिल्ह्यातील मृत्यूची आकडेवारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाने दिलेल्या दैनंदिन प्रेस नोटमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असुन ही बाब गंभीर स्वरूपाची आहे त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी कारणे दाखवा नोटीस आरोग्य उपसंचालक डॉ माले यांनी जिल्हा साथरोग अधिकारी,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व डेटा मॅनेजर यांना काढली आहे. या आकडेवारीत तात्काळ दुरुस्ती करून सुधारीत प्रेस नोट काढावी असे सांगितले तरी 2 दिवस यावर कोणतीही अमलबजावणी करण्यात आली नाही, या नोटीसीला आरोग्य यंत्रणेने केराची टोपली दाखवली आहे. कोविड पोर्टलनुसार 5 जुलै पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 1861 रुग्णांचा मृत्यू झाला होता मात्र जिल्ह्याच्या दैनंदिन प्रसिद्धी पत्रकात 1376 मृत्यू दर्शविले आहेत त्यामुळे 485 मृत्यूची तफावत आहे.या तफावतकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले असुन याबाबत राज्याचे आरोग्य संचालकांनी वारंवार तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. आकडेवारी दुरुस्तीबाबत वारंवार फोन , व्हीसीमध्ये सुचना करूनही अहवालात सुधारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे तात्काळ माहिती अद्यावत करावी अन्यथा शिस्तभंगाची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे.
कोरोना मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर कोविड पोर्टलवर मृत्यू नोंद येण्यास उशीर लागत असल्याचे गोड व सोयीनुसार कारण दिले जात होते मात्र आता त्याच पोर्टलने जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारभाराची पोलखोल केली आहे. खुद्द आरोग्य संचालक यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने आरोग्य उपसंचालकांनी नोटीस काढण्याची वेळ आली आहे. नोटीस काढून 2 दिवस झाले तरी आकडेवारीत दुरुस्ती झाली नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 58 हजार 955 रुग्ण सापडले असून त्यापैकी 56 हजार 997 रुग्ण बरे झाले असल्याने हे प्रमाण 96.67 टक्के आहे. तर प्रेस नोट वरील आकडेवारीनुसार 1380 रुग्णांचा मृत्यू झाला असुन मृत्युदर 2.34 टक्के आहे. कोविड पोर्टलनुसार मृत्यू आकडेवारी विचारात घेतली तर 1861 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा 3.15 टक्के येतो म्हणजे मृत्यूच्या आकड्यात 485 तर मृत्युदरमध्ये 0.81 ची तफावत येऊन तो वाढतो.
जिल्हा प्रशासनासाठी मृत्यूचे हे आकडे असले तरी याच आधारावर सरकार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाला व वारसांना विविध शासकीय योजनामार्फत मदत करीत आहे त्यामुळे अद्यावत आकडेवारी समोर येणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.