कोरोना वॉरियर्स डॉक्टरांच्या पाठीवर पद्मभूषण कुकडे काकांची कौतुकाची थाप !
डॉक्टरांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्याचे केले आवाहन
आयएमए वुमन्स विंगच्या वेबिनारमध्ये शेकडो डॉक्टरांचा सहभाग
लातूर/प्रतिनिधी:कोरोना काळात डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत अहोरात्र रुग्णांची सेवा केली. डॉक्टरांच्या या कार्याचे कौतुक करत पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. डॉक्टरांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे आवर्जून लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आयएमएच्या महिला विंगच्या वतीने डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांसाठी एक वेबिनार घेण्यात आला.
आयएमए वुमन्स विंगच्या लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ.मोहिनी गानू,उपाध्यक्षा डॉ.प्रीती बादाडे,सचिव डॉ.राजश्री सावंत यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका व गडचिरोली येथील सर्च या संस्थेचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी या वेबिनारच्या माध्यमातून राज्यभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठा ताण पडला. सहाजिकच डॉक्टरांनाही शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागला.या काळात डॉक्टरांना वैयक्तिक आयुष्य विसरून जात रुग्णसेवा करावी लागली.सर्व डॉक्टर्स या संकटाला खंबीरपणे सामोरे गेले.या काळात आलेल्या अडचणी, सहन करावा लागलेला ताणतणाव,आरोग्यविषयक तक्रारी यासंदर्भात दोन्ही मान्यवरांनी उपयुक्त सूचना केल्या.डॉक्टरांनी समाजाशी कसे संबंध ठेवावेत ? समाज व शासनाकडून डॉक्टरांच्या काय अपेक्षा आहेत? यासंदर्भातही ते बोलले.
संकटाची तमा न बाळगता या आपत्तीला धैर्य आणि सक्षमपणे तोंड दिल्याबद्दल कोरोना वॉरियर्स डॉक्टरांचे त्यांनी कौतुक केले.डॉक्टरांनी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ?याचाही सल्ला डॉ.अभय बंग यांनी दिला.
राज्यातील शेकडो डॉक्टर्स या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.डॉ.कल्याणी सास्तुरकर यांनी या वेबिनारचे प्रास्ताविक केले.
वेबिनारच्या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांच्या निवासस्थानी जाऊन काका व डॉ.सौ.ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लातूर शाखेच्या अध्यक्षा डॉ.मोहिनी गानू,सचिव डॉ,राजश्री सावंत,सहसचिव डॉ.सुवर्णा कोरे,कोषाध्यक्षा डॉ. चारुशीला उदगीरकर, सहकोषाध्यक्षा डॉ. स्नेहल शिवपुजे,राज्य प्रतिनिधी डॉ.संगीता देशपांडे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.