डेंग्युने पाच बालकाचा मृत्यु ; लातूर मनपाचे दुर्लक्ष
लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे मनपा आयुक्तांना साकडे
लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे मनपा आयुक्तांना साकडे
लातूर दि.23/08/2021
लातूर शहरामध्ये सध्या डेंग्युचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे डेंग्युमुळेच पाच बालकाचा मृत्यु झालेला आहे. हे वास्तव असतानाही मनपाने डेंग्यूचा सामना करण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. अगोदरचा कोरोनाने आर्थिक गणित कोलमडलेल्या लातूरकरांना पुन्हा या डेंग्यू आजाराला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यामुळे लातूरकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यावर लातूर महानगरपालिकेने लक्ष देवून डेंग्यूबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजाराला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेवून लातूर महानरगपालिकेने पावसाळ्यापुर्वीच गटारी साफ करण्याची मोहिम हाती घेणे गरजेचे होते. परंतु याकडे मनपाने लक्ष दिलेले नाही. गटारी साफ करण्याची मोहिम राबविण्याऐवजी कागदोपत्री चालविली. त्यामुळे लातूरकरांना डेंग्यु सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक वार्डामध्ये पाहिले तर तुंबलेल्या गटारी दिसून येतील सध्या महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर सर्वे झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये आठ दिवसाला पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा साठा असणे स्वाभविक आहे. बर्याच दिवसाचा असलेला पाण्याचा साठा डेंग्यूसाठी पुरक आहे. ते माहित असतानाही मनपाकडून अॅबेटिंगची फवारणी केली जात नाही. त्यामुळे नुकताच पाच बालकांचा डेंग्युमुळे मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने आतातरी लक्ष देवून डंग्यू अजारावर उपाययोजना करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये अॅबेटिंगची फवारणी करावी. त्यामुळे डेंग्यू आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळेल. त्यामुळे लातूर मनपाने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याच्यावतीने भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. या निवेदनावर लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
-----
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.