समाज कल्याण विभागाकडून स्वयंसहायता युवा गटाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण करण्याचा निर्धार!*


*समाज कल्याण विभागाकडून स्वयंसहायता युवा गटाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण करण्याचा निर्धार!*



 

*समाज कल्याण विभाग व बार्टी चा अभिनव उपक्रम, राज्यात 50 हजार गटाचे लक्ष*

 

*लातूर विभागात १४२ गट स्थापन झाले असून ६२४ युवकांचा या गटात समावेश*










लातूर, दि.5(जिमाका):-राज्याच्या समाज कल्याण विभागाने राज्यातील अनुसूचित जातीतील  वंचित/दुर्बल घटकांतील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यापर्यंत थेट योजना पोहोचवण्यासाठी "स्वयंसहाय्यतेतून सर्वागीण विकास" ही उद्दिष्टे ठेवून  स्वयंसहाय्यता युवा गट स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) व समाज कल्याण विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणार्यान या उपक्रमाद्वारे राज्यातील प्रत्येक गावात युवा गट स्थापन होणार असून ५० हजार गट स्थापन करण्याचे लक्ष विभागाने ठेवले आहे.

राज्याचे समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही अभिनव संकल्पना सादर केली आहे. त्यानुसार वय वर्ष १८ पूर्ण केलेला युवक-युवती, ज्यांना समाज कार्याची आवड आहे , शिक्षण किमान दहावी पास आहेत, स्वयंसेवक म्हणून विनामोबदला काम करण्याची इच्छा आहे. व ज्याची स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायची तयारी आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसलेला, समाजातील नागरिकांसाठी समाजसेवी भावनेने काम करणाऱ्या तरुणांचा या गटामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहकारी संस्था, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देखील पात्रता निकषानुसार समावेश करून घेण्यात येत आहे. सदर युवा गटांमध्ये ८० टक्के हे अनुसूचित जाती चे सदस्य राहणार असून २० टक्के इतर दुर्बल घटकातील सदस्यांचा समावेश असणार आहे.

राज्यात बार्टीच्या माध्यमातून सध्या तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या ३५४ समतादूतांवर स्वयंसहाय्यता युवा गट स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा गटात सहभागी होणाऱ्या युवकांचा स्व-विकास व सबळीकरणाकडे  विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या मार्फत हे कार्य करण्यात येत आहे. ११ ते १५ सदस्यांचा स्थापन करण्यात आलेल्या युवा गटांना क्लस्टर विकसित करण्यासाठी, सर्व शासकीय योजनांचा लाभ देणे, उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी, मार्गदर्शन करणे, लघु उद्योग,  बेकरी, प्लस्टर इत्यादी साठी प्रेरणा देणे , आवश्यक मदत करून अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये उत्पादकता, उद्योजकता वाढवणे व उद्योजक तयार करणे, आर्थिक व सामाजिक विकास साधणे. त्याचप्रमाणे युवक-युवती शेतकरी स्वयंसहायता गट, सहकारी संस्था यांना उद्योग व्यवसाय मार्गदर्शन करणे व सहकार्य करणे, संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार करणे, उद्योजकता व कौशल्य विकास यांच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हे कार्य करण्यात येणार आहेत. कार्यरत समतादूत यांच्यामार्फत या युवा गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे, व त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचे पात्र व वंचित लाभार्थी शोधून बार्टी मार्फत सामाजिक न्याय विभाग व इतर विभागास कळविणे तसेच अनुसूचित जातीची लोकसंख्या अथवा गावात आवश्यकता योजनांची पूर्तता होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधणे हे देखील कार्य समतादूत व युवा गटामार्फत करण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतींच्या पहिल्या टप्प्यात १ हजार दुसऱ्या टप्प्यात १० हजार व अंतिम टप्प्यात ५० हजार स्वयंसहायता युवा गट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वय साधण्यासाठी प्रकल्पाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्वयंसहायता युवा गट यांचे कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्त, समाज कल्याण पुणे व महासंचालक बार्टी व सर्व प्रादेशिक उपायुक्त यांचा समावेश करून राज्यसमिती गठीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक स्तरावर व जिल्हा स्तरावर देखील , प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, व समाज कल्याण अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.  

आवश्यकतेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक खिडकी मदत केंद्र सुरु करणे, विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, त्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणे यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 राज्यात प्रथमच एखाद्या शासकिय विभागाकडून अश्यापद्धतीने युवकांचा सहभाग करुन शासकिय योजनाची चळवळ उभारण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विभागात यापूर्वीदेखील अनेक महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून या उपक्रमांमध्ये आता स्वयंसहायता गट स्थापन करणे हा देखील महत्त्वाचा उपक्रम समावेश करण्यात आला आहे. बार्टीच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यात आतापर्यंत १६५६ युवागटाची स्थापना करण्यात आली असुन त्याद्वारे १२५०५ युवक गटांना जोडले गेले आहेत. लातूर विभागात १४२ गट स्थापन झाले असून ६२४ युवकांचा या गटात समावेश आहे.

*चौकट*

 “ समाज कल्याण विभागाची स्थानिक तालुकास्तर यंत्रणा नसल्याने योजना  गरजवंतापर्यंत पोहचविण्यास अडचणी निर्माण होत असल्याने स्वयंसहायता युवा गटाच्या माध्यामातुन युवकांच्या विकासाबरोबर समाजाचा सर्वांगीण विकास बार्टी च्या माध्यमातून करण्याचा निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला. स्वयंसहायता युवा गट हे अनुसुचित जातातील वंचित / दुर्बल घटकांच्या विकासासाठी सामजिक परिवतनाचे माध्यम ठरणार आहे . त्यामुळे स्वयंसहायता युवा गट येणा-या काळात अधिक भक्कम केले जातील, अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त, ‍ दिलीप राठोड यांनी दिली.

                                                                                             *****

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या