जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. विक्रम काळे यांचे प्रतिपादन



जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
आ. विक्रम काळे यांचे प्रतिपादन







लातूर : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी लातूर जिल्ह्यातील एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मेळावा लातूर  जिल्हा स्काऊट गाईडच्या सभागृहात घेण्यात आला, या मेळाव्याला संबोधित करताना आ. काळे बोलत होते. या प्रसंगी खासगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, जिल्हा गुणवत्ता संवर्धन समितीचे सदस्य प्राचार्य डी. एन. केंद्रे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अप्पाराव शिंदे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, तानाजी पाटील,  आरडले, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे शहराध्यक्ष राहुल देशमुख, प्राचार्य  उमेश पाटील, मुख्याध्यापक संभाजी नवघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात राहुल देशमुख यांनी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी, असे मत मांडले. आप्पाराव शिंदे, बजरंग चोले, मोरे, प्राचार्य उमेश पाटील, कोरे आदींनी जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा व आमच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आ. काळे यांच्यासमोर  केली. मेळाव्याचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश देशमुख यांनीही १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्याला लवकरात लवकर शासन स्तरावर निकाली काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. येत्या दिवाळीपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी शासनासमोर आपली बाजू मांडून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास मेळाव्याला संबोधित करताना आ. काळे यांनी दिला. मुख्याध्यापक संभाजी नवघरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या