३० सप्टेंबर १९९३ ची ती काळरात्र.....
गणेश विसजर्नानंतर ची पहाट होती अर्थातच ३० सप्टेंबर १९९३ सर्वजन गाढ झोपीत असताना अचानक पहाटे घराचे पत्रे हलायला लागले, विचित्र आवाज येत होते, झोपलेल्या अंथरणातच झोपाळ्यासारखे धक्के जाणवत होते. काय होत आहे हे जाणवायच्या आतच ३० सेकंदात सर्व शांत झाले. आम्ही सर्वजन मोकळ्या जागेत जमा झालो होतो. काय झाले हे कळायला मार्ग नव्हता. आम्हा सर्व लहान मुलांना घेऊन सर्व वडीलधारी मानसे मोकळ्या जागेत थांबली होती. लाईट पण गेली होती, अक्षरशः भितीने थर- थर कापत होतो. तेवढ्यात कोणी तरी सांगितले की हा भूकंप होता... त्यानंतर आणखीणच भिती वाटत होती. कारण भूकंपाबद्दल फक्त पुस्तकातचं वाचलं होतं. कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवतात असे ऐकलं होते. पण त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्यानंतर सकाळ पर्यंत जवळपास चार भुकंपाचे धक्के जाणवले. सर्वात मोठा धक्का हा ६.७ रिक्टर स्केल चा होता. सकाळ पर्यंत आम्ही त्याच मैदानात थांबलो होतो.
त्यानंतर कित्येक रात्री देखील त्याच मैदानात झोपावे देखील त्याच मैदानात झोपावे लागले. सकाळ झालीली तशा बातम्या येऊ लागल्या. किल्लारी, सास्तूर, तळणी परिसरातील लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील कित्येक गावे जमीनदोस्त झाली होती,गावच्या गांव बेचिराक झाली होती, कित्येक लोक मृत्युमुखी पडली होती, कुटंबाचे कुटूंब मृत्यूच्या दाडेत सामावली होती. शोक कोण करणार आण सांत्वन कोण करावे कळत नव्हतं. संपूर्ण राज्यातून देशातून परदेशातूनही मदतीचा ओघ चालू होता. बचावकार्यासाठी स्वयंसेवक, पोलीस, सैन्य दलातील जवान अहोरात्र झटत होती.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार किल्लारी परीसरात राहून संपूर्ण मदतकार्या वर जातीने लक्ष देत होते.
आम्ही शालेय जीवनात होतो, पण समाजसेवेची आवड असल्या कारणाने आपणही कांही करता येते का याच्या विचारात होतो. त्यावेळी कळाले की औसा ग्रामीण रुग्णालयात भूकंपग्रस्त भागातील कांहीं रुग्ण आणलेली आहेत, पण त्यांना जेवणाची व्यवस्था नाही. आम्ही १०-१२ मित्रांनी संपूर्ण गल्लीत फिरून भाकरी, चपात्या, वरण,भाजी,चटणी,भात जे-जे मिळेल ते गोळा केले व ग्रामीण
रुग्णालयात नेऊन दिले. प्रत्येक जण आप-आपल्या परीने मदत करत होते, कोणी अन्न आणून देत होते,कोणी कपडे आणून देत होते. कोणी आंथरून पांघरूण देत होते.पण आभाळचं फाटले होते, कित्येक मृत्युमुखी पडलेल्यांना अंत्यविधी साठी लाकडे मिळत नव्हती, एका-एका सरणावर ४० ते ५० मृतदेह जाळण्यात येत होती. कित्येक जणांना जागा मिळेल त्याठिकांणी खड्डे करून पुरण्यात आले. कित्येक बालक अनाथ झाली कित्येक महीला विधवा झाल्या, अनेकजणांच संसार मोडला, कित्येक जणांना मनोविकार जडला. आजही ती काळरात्र आठवली तर अंगावर शहारे येतात. अल्लाह... ईश्वर... कडे प्रार्थना की अशी वेळ पुन्हा कधीही, कोणावर ही न येवो.
आज ३० सप्टेंबर २०२१ रोजी किल्लारी येथे झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २८ वर्षे पूर्ण होत आहेत त्या भूकंपात मृत्यूपावलेल्या सर्व ज्ञात-अज्ञातांना भावपूर्ण श्रद्धांजली, खिराजे अकीदत...
आठवण...
*डॉ.जिलानी पटेल*
होमिओपॅथिक तज्ञ
*लाइफलाइन होमिओ क्लिनिक, औसा.*
मो - *9970737297*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.