भूकंपाच्या वेदना शमतील काय आण न्यायासाठी लढणाऱ्यांचे अश्रू पुसले जातील काय? औसा तहसीलचा अजब कारभार,वतनदारालाच केले निराधार.
औसा-३० सप्टें. १९९३ च्या भुकंपात लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील एकूण ५२ गाव उद्ध्वस्त झाली.परंतू सर्वस्व गमावलेल्या हजारो लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष २८ वर्षांनंतरही संपलेला नाही.याचच एक उदाहरण म्हणजे औसा तहसीलचा अजब कारभार,वतनदारालाच केले निराधार या प्रत्ययानूसार आणि मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचा सुध्दा अवमान कांही महाभागांनी प्रशासनातील सुस्तावलेल्या व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी भुकंपग्रस्त भागातील हरेगाव ता. औसा येथील ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकासोबत केलेला आहे. कारण अद्यापपर्यंत शासनाने पुर्नवसित घरात त्यांना प्रवेश दिलेला नाही.
मूळ हरेगावच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकालाच तहसील प्रशासनाने निराधार केले आहे. तालुक्यातील हरेगाव येथील रसुल महेताबसाव शेख यांची वडिलोपार्जित शेती व घर असल्याचे पुरावे दाखल करुनही महसूल प्रशासनाने त्यांना गावात पुर्नवसित आराखडयात घर दिलेले नाही. दि.३० सप्टें. १९९३ च्या भुकंपात त्यांचे घर जमिनदोस्त होऊन त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला.शेख यांनी १९९४ पासून अनेक वेळा घर मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पासून ते मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला.
भुकंपानंतर गावाचे स्वयंसेवी संस्थेमार्फत बांधकाम होऊन पुर्नवसन झाले. मात्र यात शेख रसुल यांना घराचे वाटप करण्यात आले नाही. कारण घर वाटप करताना गावातील धुरंधर राजकारणी व प्रशासकीय यंत्रणेने जाणुनबुजुन त्यांना घराच्या लाभापासून वंचित ठेवले, या प्रकरणी शेख यांनी दि. १४ फेब्रुवारी १९९४ रोजी उपविभागीय अधिकारी लातूर येथे आक्षेप अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही म्हणून मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १९९५ मध्ये तक्रारअर्ज दाखल केला.
मात्र उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन शेख रसुल यांना घर देण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्या आदेशानुसार मा.जिल्हाधिकारी लातूर यांनी दि. १९ ऑगस्ट १९९९ रोजी भुकंप कक्ष १ कावि ७२८ क्र.९९ या पत्रानुसार औशाच्या तहसीलदारांना नारायण रंगनाथ आडसूळ रा. दापेगाव व रसुल महेताबसाब शेख रा. हरेगाव यांना घर वाटप करावे असा आदेश दिला.परंतु नारायण रंगनाथ आडसूळ यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दापेगाव येथे २ हजार चौ. फुटाचा एक प्लॉट वाटप करण्यात आला. मात्र रसूल शेख यांना २४० चौ. फुटांचे घर वाटप करावे व एक आठवडयाच्या आत तसा अहवाल पाठवावा,असे आदेश देऊनही औसा तहसील कार्यालयात याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.तसेच या प्रकरणात स्थानिक मतदारसंघाचे माजी आमदार मा.बसवराज पाटील यांनी दि.०७ मार्च २०१२ रोजी मा.जिल्हाधिकारी लातूर भुकंप पुनर्वसन यांना मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार कार्यवाही होऊन शेख रसुल यांना घर मिळावे म्हणुन पत्र दिले पण त्यांच्या पत्राला सुध्दा केराची टोपली मिळाली. या प्रकरणी शेख यांनी शेवटी लोकशाहीदिनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे अर्ज दाखल केला.परंतु त्याची अद्यापपर्यंत दखल घेतली गेलेली नाही व न्याय देण्यात आला नाही. संबंधित शिक्षकाला त्याच्या जन्मगावी वारसाहक्काचे वंशपरंपरागत वडिलोपार्जित घर सेवानिवृत्तीस १४ वर्षे झाले तरी अद्याप ते मिळालेले नाही तसेच न्यायालयाने आदेशीत करुनही तो आदेश दुर्लक्षीत केला जात आहे. मग एका सेवानिवृत्त शिक्षकाला एवढा त्रास अद्याप पर्यंत सहन करावा लागलेला आहे तर मग सामान्य जणाचे काय हाल होत असतील. एवढी उपेक्षा,आबदा सहन करुन २८ वर्षे सहनशिलता बाळगलेल्या या अवलियाला सलामच करावा लागेल. कारण मोडेन पण वाकणार नाही या वास्तव्यावर आपलं कर्म चालू ठेवून, प्रशासनाचे उंबरठे झिजवून एक ना एक दिवस सत्याचं विजय होईल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि त्याच धर्तीवर आपली संघर्षगाथा या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आजतागायत चालू ठेवलेली आहे.विचार करायची गोष्ट आहे कि ज्यांनी ऐवढी वर्षे आपल्या जन्मगावी भुकंप पुनर्वसन योजनेत घर मिळाव म्हणून आजतागायत संघर्ष चालू ठेवलेला आहे. सहनशिलतेने एवढया वर्ष संघर्ष करणे म्हणजे एकटयाने डोंगर पोखरल्या सारखं आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे तिथं रिकामी घरे भरपूर आहेत, कित्येक ठिकाणी कब्जे झालेली आहेत, कित्येक ठिकाणी त्या घरात गुरं-डोरं बांधलेली आहेत तरी सुद्धा प्रशासनातील कर्त्या-धर्त्यांना हे दिसत नाही. आजपर्यंत या काटेरी वाटेतील संघर्ष पार करत एकटा माणूस प्रशासनाच्या गलथान कारभारा सोबत चार हात करीत आहे.कारण त्यांना शाश्वती आहे. एक उमेद आहे कि एक ना एक दिवस उजाडेल आणि न्याय नक्कीच मिळेल म्हणून तर ना भूकंपाच्या वेदना शमतील काय आण न्यायासाठी लढणान्यांचे अश्रू पुसले जातील काय?
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.