बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील आव्हाने पेलू शकतील
------------------------------ ---------------
स्नेहसंवर्धन पुरस्कार वितरण समारंभात अमर हबीब
------------------------------ ---------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी)--
बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा अंतरभारतीचे राष्ट्रीय महासचिव अमर हबीब यांनी व्यक्त केले.
येथील नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अंतरभारती अंबाजोगाई शाखेच्या वतीने राजू जांगीड यांना प्रदान करण्यात येणाऱ्या ८ व्या स्नेहसंवर्धन पुरस्कार वितरण समारंभात अमर हबीब बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले तर अध्यक्षा म्हणून प्रा. डॉ. अलका वाळचाळे या उपस्थित होत्या.
अमर हबीब पुढे म्हणाले की, समाजातील तरुणांनी प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून येणारे नवनवे बदल स्वीकारण्याची क्षमता आपल्या मध्ये निर्माण केली पाहिजे. ज्या प्रमाणे वाहते पाणी शुध्द राहते आणि साचलेल्या पाण्यात कीडे निर्माण होतात, त्यामुळे तरुणांनी सतत प्रवाही राहीले पाहिजे. नवे बदल स्वीकारण्याची क्षमता आपल्या मध्ये निर्माण केली पाहिजे.
भिन्न संस्कृती मिसळुन त्यांचा संकर झाल्या शिवाय नवी संस्कृती निर्माण होत नसते. हे तत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. संकरातूनच संस्कृतीचा विकास होत असतो.
विभीन्न जाती धर्म, भाषा, प्रांतातील लोकांना एकत्र आणून माणसांचा समुह निर्माण करण्यासाठी आंतरभारतीची निर्मिती झाली असून हे सुत्र प्रचलीत करण्यासाठी अंतरभारती अंबाजोगाई शाखेच्या वतीने "स्नेहसंवर्धन" या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारचा पुरस्कार हा भारतातील एकमेव पुरस्कार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुळात अंबाजोगाई शहर हे बाहेरुन आलेल्या लोकांनी दिलेल्या योगदातुन मोठे झाले, नावारुपाला आलेले शहर असल्याचे सांगून अमर हबीब यांनी या शहरात आलेल्या इतिहास कालीन संत परंपरेतील संत मुकुंदराज, संत दासोपंत, यांच्या पासुन ते अलिकडील काळातील स्वामी रामानंद तीर्थ, ए. मा. कुलकर्णी, डॉ. व्यंकटराव डावळे, प्राचार्य बी. आय. खडकभावी
यांच्या नावाची उदाहरणे दिली. अशी अनेक नावे सांगता येतील असे ही त्यांनी सांगितले.
अंतरभारतीच्या वतीने देण्यात येणारा स्नेह संवर्धन हा पुरस्कार अंबाजोगाई शहरात बाहेरुन येवून या शहराचे नांव मोठे करण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांचा गौरव करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारा पुरस्कार आहे. हा कार्यक्रम संपुर्ण गावाचा आहे. लोकांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ज्यांची इच्छा असेल त्यांच्या कडून फक्त १०० रुपये मदतीचा सहभाग घेवून हा कार्यक्रम करण्यात येतो. सत्कारमुर्तीचे कसलेही कॉन्ट्रुब्युशन यात घेतले जात नाही, असेही त्यांनी सांगितले. संपुर्ण
गावांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा कार्यक्रम गावांचा कार्यक्रम आहे.
बाहेरुन आलेल्या प्रत्येकाला अंबाजोगाईकर होण्याची इच्छा असते, अशा लोकांना अंबाजोगाईकर करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
*शेरो-शायरीची रंगत*
या कार्यक्रमात आपल्या शेरो-शायरीच्या सहाय्याने केलेल्या खुमासदार शैलीत डॉ. राजेश इंगोले यांनी सत्कारमुर्ती राजू जांगीड या़चे संपुर्ण जीवन चरित्रच सभागृहासमोर उभे केले. राजू जांगीड याने अत्यंत विश्वासाने, प्रामाणिकपणे, पोटाला चटके आणि आर्थिक फटके सहन करीत निर्माण केलेल्या विश्वासाचा सन्मान अंतरभारतीने हा पुरस्कार देवून केला, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजातील विविध स्त्रआवरील लोकांची निवड केल्या बद्दल त्यांनी आंतरभारतीचे कौतुक केले.
*सत्कारमूर्तींचा शब्द*
या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना राजू जांगीड यांनी अंबाजोगाईकरांनी माझ्यावर पुरस्कार देवून टाकलेल्या विश्वासास कधीही तडा जावू देणार नाही, कायम ऋणात राहून अंबाजोगाईकरांची प्रामाणिक सेवा करु असे आश्र्वासन देत आपल्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. अलका वाळचाले यांनी अंबाजोगाई शहरातल्या सांस्कृतिक जडणघडणीत स्नेहवर्धन पुरस्काराचे स्थान मोठे असल्याचे सांगितले.
स्नेह संवर्धन या पुरस्काराने या पूर्वी सन्मानित केलेल्या शंकर मेहता, प्राचार्य बी. आय. खडकभावी, प्राचार्य एम. बी. शेट्टी, आनंदराव अंकाम यांच्या हस्ते राजू जांगीड यांना या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा आणि मिलिंद बोकील आणि अमर हबीब यांनी संपादित केलेले "धुन तरुणाई" हे पुस्तक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राजू यांच्या पत्नीचा डॉ अलका वालचाळे यांनी साडी-चोळीचा आहेर करून सत्कार केला.
वैजनाथ शेंगुळे आणि अनिकेत डिघोळकर यांनी गायलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिकेत दिघोळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्र वाचन केले. राजू जांगीड यांचा परीचय संतोष मोहीते यांनी करुन दिला. संचालन ज्योती शिंदे यांनी केले तर आभार दत्ता वालेकर यांनी मानले. या कार्यक्रमास अंतरभारतीचे सर्व सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. सुरेश सोनवलकर, मुजीब काजी, सेवानिवृत्त अभियंता गावरसकर, प्रा. मधुकर इंगोले यांच्यासह शहरातील मान्यवर व जांगीड यांचे आप्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.