मानवकल्याणासाठी ईश्वराचे सहाय्यक बना
तौफिक असलम खान यांचे प्रतिपादन
लातूर ः आपल्या व समाजाच्या हितासाठी ईश्वरीय आदेशाचे आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक असून, ईश्वराचा मानवकल्याणासाठी जो संदेश आहे त्याला समजून तो अमलात आणला तर आम्ही निश्चितच ईश्वराचे सहाय्यक बनू, असे प्रतिपादन जमाअतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तौफिक असलम खान यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, शहराध्यक्ष अशफाक अहेमद, जिल्हाउपाध्यक्ष आरीफ शेख, अर्शद फलाही, अन्वरूल्लाह इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील हमीदिया मस्जिद येथे रविवारी जमाअते इस्लामी हिंद द्वारा आयोजित ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तौफिक असलम खान म्हणाले, आज देशामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, एक दिवसही असा जात नाही जेव्हा महिलांविरूद्ध हिंसा किंवा बलात्कार होत नाही. व्याजाच्या विळख्याने अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, श्रीमंत लोक गरीबांची लूट करीत आहेत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, सरकार स्वतःच्या बळावर समाजाचे व्यापक हित साध्य करू शकत नाही. नागरिकांनाही सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे लागेल. कुरआनमधील सुरे सफ आयत क्र. 34 मध्ये ईश्वराने आवाहन केलेले आहे की, मानवतेच्या कल्याणासाठी अल्लाहचे सहाय्यक बना. ईश्वरीय ईच्छेच्या पूर्ततेसाठी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशाने राज्यभर ’कूनू अन्सारल्लाह’ अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना. या शिर्षकाखाली 4 ते 13 सप्टेंबर दरम्यान विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केलेली आहे.
कार्यक्रमाचा आरंभ मुफ्ती अब्दुल्लाह यांच्या कुरआन प्रवचनाने झाला. प्रस्तावनेत शहराध्यक्ष अशफाक अहेमद यांनी मोहिमेचा परिचय करून या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यानंतर एम.आय. शेख यांनी जमाअते इस्लामी संदेश या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी देशाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत सर्वांना नैतिक आचरण करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर जमाअते इस्लामी हिंदचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद आरीफ यांनी जमाअते इस्लामी हिंदचा परिचय करून दिला. त्यानंतर अर्शद फलाही यांनी दस्तूर जमाअते इस्लामी हिंद अर्थात जमाअतच्या नियमावली संबंधी विवेचन करीत जमाअत ही जनहिताचे काम करणारी एक शिस्तबद्ध संघटना असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सय्यद मिसबाहुउद्दीन हाश्मी यांनी कूनू अन्सारूल्लाह आयातीचे विश्लेषण करत समाजकल्याणाच्या कामामध्ये प्रत्येकाने अल्लाहचे सहाय्यक बणून आपला वाटा उचलावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचा शेवट जमाअते इस्लामी हिंद राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तौफिक असलम खान यांनी केलेल्या दुआ (प्रार्थनेने) झाला.सूत्रसंचालन साबेर काजी, साजीद पठाण यांनी मानले. कार्यक्रम कोविड नियमांच्या
आधीन राहून पार पाडण्यात आला. ऑनलाईन कार्यक्रमात अनेकांनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.