कोरोनाच्या संकटामुळे औशात साध्या पद्धतीने गणरायाला निरोप
औसा (प्रतिनिधी) औसा शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे धार्मिक उत्सवाला प्रशासनाने बंदी आणल्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली विघ्नहर्त्या गणरायाला गणेशभक्तांनी अत्यंत साध्या पद्धतीने निरोप दिला. सर्वप्रथम शहरातील मानाचा गणपती वीरशैव गणेश मंडळाच्या
पदाधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजता येथील सार्वजनिक विहिरी मध्ये श्री चे विसर्जन केले. औसा नगर परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी फिरत्या वाहनाची व्यवस्था नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख आणि मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केली होती. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गल्लीबोळात मध्ये जाऊन श्री गणेशाच्या मूर्तीचे संकलन करून विसर्जन केले. कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही गणेश मंडळाने मिरवणूक न काढता अत्यंत साध्या पद्धतीने श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले. शहरातील धर्मवीर संभाजी, आजोबा गणेश मंडळ, मराठा गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ, नरसिंह गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, फक्त मैत्री गणेश मंडळ, शिवगिरी गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश मंडळ या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले. कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा मिरवणूक न काढता अत्यंत साध्या पद्धतीने श्री चे विसर्जन करण्यात आले परंतु दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यामध्ये विविध गणेश मंडळांनी सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अशा लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून समाज प्रबोधन करण्यासाठी सहभाग नोंदविला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.