रक्तदान महासंकल्पात सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार


 रक्तदान महासंकल्पात सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार 


रोटरी मिडटाऊनचा उपक्रम 


लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आणि मधुबन अँड मोर सुपर मार्केटच्या वतीने गणेश उत्सवादरम्यान रक्तदान महासंकल्प २०२१ राबविण्यात आला.या उपक्रमास सहकार्य करून रक्तदान करून घेणाऱ्या गणेश मंडळांचा रोटरीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे,माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, यांच्यासह रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊचे अध्यक्ष सतीश कडेल,सचिव दिनेश सोनी व अनिल टाकळकर,प्रोजेक्ट चेअरमन मोतीलाल वर्मा,रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष प्रसाद वारद,सचिव सत्यजित धर्माधिकारी व निखिल कुलकर्णी,प्रोजेक्ट चेअरमन शौनक दुरुगकर,मधुबन ॲण्ड मोरचे शिवकांत ब्रिजवासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

      रोटरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकूण ६४ गणेश मंडळांनी २१५१ युनिट रक्तसंकलन करून विविध रक्तपेढ्यांना भेट दिली.त्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये सिद्धेश्वर गणेश मंडळ,लातूर,शिवमुद्रा गणेश मंडळ हरंगुळ,जय जगदंबा मंडळ,बामणी,जवळगा गणेश मंडळ,मराठवाडा गणेश मंडळ,अहमदपूर, ब्रह्मदेव गणेश मंडळ,आझाद गणेश मंडळ,राजमुद्रा गणेश मंडळ,शेंद,श्री गणेश मंडळ तीर्थवाडी,महादेव गणेश मंडळ,शिरूर,मैत्री गणेश मंडळ,औसा,प्रभात गणेश मंडळ,कामखेडा,बाळनाथ गणेश मंडळ,चिकुर्डा आदी गणेश मंडळांचा समावेश होता.


         माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी यांनी विविध कथांच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.सर्व प्रकारच्या दानामध्ये नवजीवन प्रदान करणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे ते म्हणाले. प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्रम राबवताना बदलत्या मानसिकतेचा प्रत्यय दिल्याचे मत व्यक्त केले.भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.हे तरुण नव्या भूमिकेतून काम करू लागले तर रक्तदानाचा हा उपक्रम अतिशय लाभधारक ठरेल, असेही ते म्हणाले.

           या कार्यक्रमास रोटरी व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या