शेतकऱ्यांच्या मागण्या साठी छावा संघटनेचे औसा तहसील समोर जागरण गोंधळ आंदोलन

 शेतकऱ्यांच्या मागण्या साठी छावा संघटनेचे औसा तहसील समोर जागरण गोंधळ आंदोलन




औसा (प्रतिनिधी)दि.८

मागील अनेक दिवसापासून सतत अतिवृष्टी पडत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी गेल्याने व अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेल्यामुळे तसेच शेतातील माती खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार कोणत्याही प्रकारची ठोस मदत करण्याची भूमिका अद्याप घेत नसल्यामुळे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या एफ आर पी ची रक्कम देत नसल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दि. 8 ऑक्टोबर रोजी जागरण गोंधळ आंदोलन सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पारंपारिक संबळ वाजवत गळ्यात कवड्यांच्या माळा घालून कपाळावर मळवट भरून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला सुबुद्धी यावी म्हणून आई जगदंबेला अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साकडे घालीत जागरण गोंधळ आंदोलनाला प्रारंभ केला आहे. संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवानदादा माकणे, विष्णू कोळी, यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष आराधी आणि गोंधळी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जागरण गोंधळ सारख्या या अनोख्या आंदोलनाने औसा तालुक्यातील प्रशासनाचे व राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या