राजमाता जिजामाता'च्या सोनियाने लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आ. विक्रम काळे यांचे गौरवोद्गार

राजमाता जिजामाता'च्या सोनियाने
लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला
आ. विक्रम काळे यांचे गौरवोद्गार







लातूर : येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी सोनिया राजेंद्रकुमार जायेभाये हिने नुकत्याच गोवा येथे झालेल्या नॅशनल थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप-२०२१ मध्ये १७ वर्षांखालील गटातून राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला असून तिने ऑलम्पिक स्पर्धेतही यश संपादन करावे, असे प्रतिपादन शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.
राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात आज सोमवारी शाळेचा पहिला दिवस शिक्षणोत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. काळे बोलत होते. प्रारंभी आ. काळे यांच्या हस्ते सोनिया जायेभाये हिला शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचे कौतूक करण्यात आले. यानंतर संकुलातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी आ. काळे म्हणाले, ऑनलाईन शिक्षण देताना इंटरनेट सेवा, अ‍ॅण्ड्रॉईड फोनअभावी व इतर तांत्रिक कारणांमुळे मागचे दीड वर्ष शैक्षणिक क्षेत्रासाठी खूप अडचणीचे गेले. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तरीही शासनाने व गुरुजनांनी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आजपासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरु झाली आहेत. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षकवर्ग भरून काढेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. मंचावर संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, राजेंद्रकुमार जायेभाये, प्राचार्य जी. आर. मुंडे, वैशाली केंद्रे, करिश्मा केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सोनियासह तिच्या आई-वडिलांचा आ. काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी केंद्रे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. ए. एस. खोत, प्रा. एस. एम. जाधव, प्रा. वैशाली पाटील, प्रा. के. डी. मुंडे, प्रा. राजकुमार जाधव, प्रा. एम. एन. पवार, प्रा. डी. डी. मुंडे, प्रा. आर. ए. बदने, रमेश बिराजदार, मदन धुमाळ, तानाजी पाटील, मुख्याध्यापक आर. पी. मुंडे, मुख्याध्यापक अविनाश पवार, प्राचार्य अरुण करदुरे, परमेश्वर गित्ते, शिवकांत वाडीकर, विष्णू कराड, हणमंत बिराजदार, शिवकुमार चिकले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या