शेतकरी हिताच्या लढ्यासाठी तुमच्यासोबत-विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

 

शेतकरी हिताच्या लढ्यासाठी तुमच्यासोबत-विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
















सरकारला देणार 72 तासाचा अल्टीमेटम-आ. निलंगेकर
निलंगा मतदारसंघातील गौर व औराद येथील शेतीनुकसानीची पाहणी
निलंगा/प्रतिनिधीः- केवळ घोषणांचा पाऊस करणार्‍या राज्य सरकारने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केलेले आहे. मराठवाडाविरोधी असणार्‍या या सरकारच्या गलथान कारभारामुळे नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याचे काम केले आहे. आधीच अस्मानी आणि त्यात सरकारचे सुलतानी संकट यामुळे शेतकरी हितासाठी जो लढा सुरु केलेला आहे त्या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांद्या लावून असू,अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निलंगा मतदारसंघातील गौर व औराद येथील शेतीत नदीचे पाणी घुसल्याने ज्या पिकांचे नुकसान झाले त्याची पाहणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अतुल सावे, आ. अभिमन्यु पवार, माजी खा. सुनिल गायकवाड, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगून याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनास पंधरा दिवसापुर्वीच पत्र देऊन जलप्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावे अशी मागणी केलेली होती. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने जलप्रकल्प पुर्ण भरल्यानंतर अचानकपणे नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात आले होते. यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचेे लक्षात आणून दिले. शेतकर्‍यांसाठी अद्यापर्यंत कोणतीही ठोस मदत न करणार्‍या या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याची टिका करत आ. निलंगेकर यांनी आपण मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांना भरघोस आणि सरसकट मदत केली होती याची आठवण करून देत आता या संकट काळात संपुर्ण मराठवाडा तुमच्याकडे आशेने बघत असून तुम्हीच पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर ज्या पद्धतीने शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्याकरीता 72 तासाचा अवधी दिला आहे. त्याचपद्धतीने आम्ही 7 ऑक्टोंबर रोजी 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन लातूरच्या शिवाजी चौकात आंदोलन करत सरकारला 72 तासाचा अल्टीमेटम देऊन शेतकर्‍यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी करणार आहोत.या मागणीनंतरही सरकारने मदत नाही दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव मोर्चा घालणार असून या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी आपण यावे अशी विनंती आ. संभाजी पाटील निलंगेकर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केली.
या विनंतीला मान देत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या लढ्यासाठी आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून असू अशी ग्वाही देऊन आता सरकारवर हल्ला लढविण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. या सरकारने नेहमीच मराठवाडा आणि विदर्भविरेाधी भुमिका घेतली असल्यामुळेच येथील शेतकर्‍यांसह जनतेवर अन्याय होत असल्याचे सांगितले.आधीच अतिवृष्टी पडल्याने शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आलेले होते मात्र सरकारच्या निष्क्रीय आणि दुर्लक्षीत भुमिकेमुळे शेतकर्‍यांना सुल्तानी संकटाला समोरे जावे लागत असल्याचे सांगून हे सरकार आणि विमा कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याचे सांगितले. विमा कंपनी सोबत राज्य सरकारचा करार होतो आणि राज्य सरकारच विमा कंपनीला नियम आणि अटी घालून देत असते.मात्र हा करार करत असताना सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य दिले नाही त्यामुळेच गतवर्षी संपुर्ण राज्याला केवळ 700 कोटी रुपयांचा पिकविमा मिळालेला होता. मात्र आमच्या सरकारच्या काळात एका-एका जिल्ह्यात 800 ते 900 कोटी रुपय पिकविमा आम्ही दिला होता याची आठवण करून देत ज्यांनी पिकविमा भरला नव्हता त्यांनाही सरकारच्या वतीने 50 टक्के मदत देण्यात आलेली होती असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पिक हिरावून नेण्याचे काम निसर्गासोबत सरकारने केले असल्याने आता सरकारने कोणतीही बहाणेबाजी न करता शेतकर्‍यांना सरसकट मदत द्यावी असे सांगून ही मदत दसर्‍यापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर न पोहचल्यास राज्यभरात भाजपाच्या वतीने मोठे आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. वेळ संकटाची असली तरी शेतकर्‍यांनी खचून जावू नये असे आवाहन करून शेतकर्‍यांनी धीर धरावा आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही देऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांना सरसकट मदत देणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.


मांजरा-तेरणा संगमावरील संकट कायमस्वरुपी दूर करा
औराद येथून जवळच मांजरा आणि तेरणा नदीचा संगम होतो. नदीपात्राद्वारे पाणी सोडल्यानंतर या दोन्ही नद्याचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या परिसरात पाणीच पाणी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याहीवर्षी मोठ्या प्रमाणात या परिसरातील पिकाचे नुकसान होऊन अनेकांचे शेत वाहून गेले आहे. यापुर्वीही अशी परिस्थिती अनेकवेळा उद्भवलेली आहे. भविष्यात हे संकट दूर करण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी सातत्याने केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे आशेने बघत असून आपण भविष्यात पुन्हा एकदा राज्याचे सुत्र हाती घेणारच आहेत त्यावेळी तात्काळ ही मागणी मान्य करून या परिसरातील शेतकर्‍यांचे संकट कायमस्वरुपी दूर करावे अशी आग्रही मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.  याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता असो वा नसो मात्र शेतकर्‍यांच्या हितासाठी ही मागणी तात्काळ पुर्ण करण्यासाठी आपण बांधील असू अशी ग्वाही देऊन लवकरात लवकर याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु होईल असा विश्वास दिला.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या