मराठवाडा विरोधी सरकारची नौटंकी बंद करणार-आ.संभाजी पाटील निलंगेकर

 

मराठवाडा विरोधी सरकारची नौटंकी बंद करणार-आ.संभाजी पाटील निलंगेकर


अन्नत्याग आंदोलनास वाढता पाठिंबा









लातूर ः जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला न्याय देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्याकरिता शेतकर्‍यांसोबत अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या आंदोलनास नौटंकी असे संबोधीत करून सत्ताधारी मराठवाड्यातील शेतकर्‍याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविण्याचे काम करीत आहेत. मात्र याच शेतकर्‍यांच्या स्वाभिमानाला उंचावण्यासाठी आणि सत्ताधार्‍यांना धडा शिकविण्यासाठी आगामी काळात मराठवाडा विरोधी सरकारची नौटंकी बंद करू असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.
लातूर येथील शिवाजी चौकात अतिवृष्टी आणि पुरस्थितीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेलेली असून जमिनीसुध्दा खरडून गेल्या आहेत. या शेतकर्‍यांना सरकारच्यावतीने सरसकट मदत  मिळावी आणि त्यांना त्यांच्या हक्काचा पिकविमा मिळावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरिता 127 शेतकर्‍यांचा कालपासून अन्नत्याग आंंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या हजारो शेतकर्‍यांना संबोधीत करतांना आ.निलंगेकर बोलत होते. यावेळी खा.सुधाकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, संघटन सरचिटणीस संजय दोरवे, जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, प्रेरणा होनराव, प्रदेश कार्यकारणी सदस्य जयश्रीताई पाटील, स्वाती जाधव,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, बांधकाम सभापती सौ.संगीता घुले, शहर भाजपाचे संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, अ‍ॅड.दिग्विजय काथवटे, उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, जिल्हा चिटणीस किरण उटगे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, जि.प.सदस्य रामचंद्र तिरूके, पंडीत सुर्यवंशी, भटक्या आघाडीचे शहराध्यक्ष अमोल गिते आदिंसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेनुसार आम्ही राज्यकारभार करीत असल्याचा दावा करणार्‍या या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय न घेता केवळ वसुली करण्यास प्राधान्य दिल्याचा आरोप करीत आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाला हरताळ फासण्याचे काम केले असल्याचे सांगितले. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा स्वाभिमानी असून शेतकर्‍यांच्या काबाड कष्टामुळेच शहराची, राज्याची, अर्थव्यवस्था अधिक गतीमान होत असते. मात्र या शेतकर्‍यांच्या स्वाभिमानाला दुखावण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केलेले असून आर्थिक आणि मानसिकरित्या कोलमडलेल्या शेतकर्‍याला अजुनही मदतीपासून वंचीत ठेवलेले आहे. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍यांना अतीवृष्टी आणि पुरस्थितीचा मोठा फटका बसलेला असून हाता-तोंडाशी आलेला घास वाहून गेलेला आहे. त्या शेतकर्‍यांना आता धीर देण्याची गरज असून तात्काळ त्यांना सरसकट मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र या नाकर्त्या सरकारने शेतकर्‍यांना अजुनही मदतीपासून वंचीत ठेवलेले असून या शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या आंदोलनाची खिल्ली उडविणार्‍या मराठवाडा विरोधी सरकारसह सत्ताधारी पक्षांची जी नौटंकी चालू आहे ती अगामी काळात बंद पाडून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आ.निलंगेकर यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह सरकारवर टिकेची तोफ डागत सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विकास केला असे सांगणार्‍या पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा विकास नव्हे तर त्यांना भकास करण्याचे काम केले असल्याचा आरोप करून आगामी काळात शेतकरी येणार्‍या प्रत्येक निवडणूकीमध्ये पालकमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला. खा.सुधाकर श्रृंगारे यांनी राज्यसरकार आपली जबाबदारी झटकून दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवित आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नेहमीच शेतकरी आणि शेतीहिताला प्राधान्य दिलेले असून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना आणि अभियान राबवित असल्याची माहिती दिली. यावेळी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनीही आंदोलनास पाठिंबा देण्यास आलेल्या शेतकर्‍यांना संबोधीत केले.
लातूरात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हाभरातून हजारो शेतकर्‍यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी येवून आपला पाठिंबा घोषीत करीत आहेत. यामध्ये क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, वीरयोध्दा संघटना, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, जिल्हा विधीज्ञ आघाडी, भुकंपग्रस्त कृतीसमिती आदिंचा समावेश आहे. 


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या