फिनिक्सचे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र प्रेरणादायक - नितीन गडकरी
लातूर/प्रतिनिधी:फिनिक्स- आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने लोदगा येथे सुरू करण्यात आलेले वाहन चालक प्रशिक्षण केंद्र हे प्रेरणादायी आहे यातून मोठ्या संख्येने तज्ञ वाहन चालक बाहेर पडतील असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोदगा येथे फिनिक्स फाउंडेशन आणि व्ही ई कमर्शिअल व्हेइकल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे तर व्यासपीठावर खा. उन्मेश पाटील,खा. ओमराजे निंबाळकर,आ. अभिमन्यू पवार,आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह लोकप्रतिनिधी व कंपनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की,देशात आज २२ लाख तज्ञ वाहनचालकांची आवश्यकता आहे.देशात प्रति तासाला होणाऱ्या अपघातात ४१५ जणांचा मृत्यू होतो. यात तरुणांची संख्या ७० टक्के आहे.रस्ते अपघात ही गंभीर समस्या असून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. वाहन चालविण्या संदर्भात प्रशिक्षण गरजेचे असून आहे रस्त्यांचा दर्जा सुधारला जात आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी अपघात निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून १५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचेही ते म्हणाले.
गडकरी यांनी सांगितले की, वाहनचालकांचे आणि समाजाचेही प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे.यासाठी पुढील पाच वर्षात किमान ८० ठिकाणी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत.प्रत्येक तालुक्यात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.लातूर हे शिक्षणात अग्रेसर आहे तसेच लातूरचे हे केंद्र इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
शेतीविषयक प्रश्नांबाबत बोलताना गडकरी म्हणाले की,आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांकडे न वळता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे.आज साखरेचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे .भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर त्यासाठी तेलबियांची लागवड आवश्यक आहे.आज देशाला ८ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते.त्या ऐवजी तांदूळ,बांबू पासून इथेनॉल बनवले तर परकीय चलन वाचेल.२०२५ पर्यंत इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनीही पेट्रोल व डिझेलचे बियाणे लावणे गरजेचे आहे.परदेशात जाणारे पैसे वाचले तर तेच शेतकऱ्यांच्या घरात येतील.यामुळे नोकरीसाठी पुणे- मुंबईला जाणारे तरूण पुन्हा आपल्या गावाकडे परततील,असेही ते म्हणाले.
बांबू लागवडीसाठी पाशा पटेल यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांचे कौतूक करत बांबू हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.
कोळशाऐवजी बांबुचा वापर करण्यास आता सरकारने परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे भविष्यात बांबुला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.बांबू लागवडीतून वर्षाकाठी एकरी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळने गरजेचे आहे.शेतकरी हा अन्नदाता तर आहेच पण आता त्याने ऊर्जादाता बनावे.
स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात पाशा पटेल म्हणाले की,लोदगा येथे सुरु होत असलेल्या या देशातील पहिल्या प्रकल्पातून मराठवाड्यातील लोकांचे भले होणार आहे.या प्रकल्पासाठी निधी दिल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानत बांबू चळवळीबाबतही त्यांनी माहिती दिली.
यावेळी प्रकल्पाला सहकार्य करणारे प्रमोद भावसार,अमृत मदान,लोदग्याचे सरपंच पांडुरंग गोमारे,सुनिल बिलापट्टे,पराग वांजरखेडकर,निखिल समुद्रे,शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.