विवेकानंद रुग्णालयाचा आरोग्यसेवेचा पॅटर्न देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा
- केंद्रीयमंत्री नितिन गडकरी
लातूर/प्रतिनिधी:आरोग्य क्षेत्रात विवेकानंद रुग्णालयाचे काम दीपस्तंभाप्रमाणे आहे.शिक्षणाचा पॅटर्न देणाऱ्या लातुरच्या विवेकानंद रुग्णालयाच्या पावलावर पाऊल ठेवत वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालये उभी राहत आहेत.विवेकानंद रुग्णालयाचा हा आरोग्य सेवेचा पॅटर्न देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.
विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर द्वारा संचलित विवेकानंद रुग्णसेवा सदनच्या लोकार्पण प्रसंगी श्री.गडकरी बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.अनंत पंढरे तर व्यासपीठावर पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका, विवेकानंद मेडिकल फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. अरुणा देवधर,विवेकानंद रुग्णसेवा सदनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे,डॉ. कैलाश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की,शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशात प्रसिद्ध आहे. आयआयटी तसेच विविध क्षेत्रात प्रवेश मिळविणारे विद्यार्थी लातूर येथे घडतात. याच लातूर पॅटर्न सोबत विवेकानंद रुग्णालयाचा वैद्यकीय पॅटर्नही आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. "जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले" हा विचार प्रत्यक्षात जगणाऱ्या कुकडे काकांनी शेकडो कार्यकर्त्यांना दृष्टी दिली.त्यातूनच आज दिसत असणारे हे विश्व उभे राहिले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काकांनी प्रेरणा घेतली. कित्येक कार्यकर्ते संघाच्या संस्कारातून घडले.काका हे त्यांच्यापैकीच एक आहेत.संघाचा विचार ते प्रत्यक्षात जगत असल्याचे ते म्हणाले.
गडकरी यांनी सांगितले की, शिक्षणासोबतच ज्ञान व वारसा पाहून तसा व्यवहार आत्मसात करणे आवश्यक असते.आपल्या अवतीभवती असणारे दुःख कमी करण्यासाठी काम करणे महत्त्वाचे असते.कुकडे काकांनी उभारलेल्या या कार्यास अभिवादन करण्याची संधी मला मिळाली.
समाजाच्या सहकार्यातून रुग्णसेवा सदनची उभारणी झालेली आहे हा धागा पकडून गडकरी म्हणाले की, चांगले काम करणाऱ्यांना समाजात अपेक्षित सन्मान मिळत नाही.चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.चांगुलपणाच्या मागे उभे राहिलो तर गुणात्मक परिवर्तन शक्य आहे.
गडकरी म्हणाले की,कोविडमुळे आरोग्य सेवेतील कमतरता लक्षात आली.आजही आपल्या देशात वैद्यकीय साधनांची कमतरता आहे.गरिबांचे प्राण वाचविण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. संवेदनशीलता हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.समाजात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढत असली तरी कर्करोग होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. अनंत पंढरे यांनी डॉ.हेडगेवार रुग्णालय विवेकानंद रुग्णालयाच्या खांद्यावर उभे असल्याचे सांगितले.वैद्यकीय क्षेत्रात विवेकानंद रुग्णालय हा दीपस्तंभ आहे.विवेकानंद रुग्णालयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो.संघटित कामातूनच मोठे काम उभे राहते,असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांनी अवघ्या दिड वर्षात ५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभा राहिल्याचे सांगितले. यापैकी साडेतीन कोटी रुपये समाजातून आलेले आहेत. समाजाच्या पाठबळावरच रुग्णसेवा सदनची उभारणी झालेली आहे.आगामी काही दिवसात विवेकानंद कॅन्सर रुग्णालयात कर्करोगावरील उपचाराच्या देशपातळीवरील ९९ टक्के सुविधा उपलब्ध होतील,असे ते म्हणाले.
प्रारंभी नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विवेकानंद रुग्णसेवा सदनचे लोकार्पण करण्यात आले.अतुल ठोंबरे यांनी श्री गडकरी तर कुकडे काकांनी डॉ.अनंत पांढरे यांचे स्वागत केले.श्री गडकरी यांच्या हस्ते देणगीदार डॉ.सौ.अरुणा देवधर,विशाल सरिया, नारायण कोचक,गिरीश पाटील,खा.सुधाकर शृंगारे, प्राचार्य विभाकर मिरजकर,
सौ. मिरजकर,शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वैयक्तिक व संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सत्कार करण्यात आला. बांधकाम कंत्राटदार अभय देशमुख व डॉ.कैलाश शर्मा यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
कमलाक्षी कुलकर्णी हिने गीत व शांतीमंत्र सादर केला. कार्यक्रमाचे संचलन कुमुदिनी भार्गव तर डॉ.कैलाश शर्मा यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी,खासदार, आमदार यांच्यासह विवेकानंद परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.