लातूर जिल्ह्याच्या हद्दीत कलम 144 लागू

 लातूर जिल्ह्याच्या हद्दीत कलम 144 लागू




लातूर,दि.30-(जिमाका) कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणात एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.

जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत संदर्भात पूढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी व दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. मदत पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या उपरोक्त दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यात दिनांक 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 09.00 ते सकाळी 06.00 वाजपर्यंत 05 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन करण्यात यावे.

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक दि. 27 नोव्हेंबर 2021 अन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई दि. 24 डिसेंबर 2021 अन्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.  31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टेंन्सींग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.

31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत,रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राही तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन व्हावे. कोवीड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणु प्रजातीचा प्रादर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.  या परिपत्रकानंतर व 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860 साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 , फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असे ही आदेशात नमूद केले आहे.

 

                                                   ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या