लग्न सोहळ्यात , पुढाऱ्यांचा सत्कार करायलाच हवा का ?

 लग्न सोहळ्यात ,

पुढाऱ्यांचा सत्कार करायलाच हवा का ?

----------------------------------------------



गोष्ट छोटी आहे.कोण  काय करावे , हा ज्याचा त्याचा प्रश्न ही आहे.या विषयात आम्ही लक्ष घालावे ? असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो आणि तो खराही आहे.शिवाय आमचे जेवढे म्हणून राज्यभर नेते मिञ आहेत त्यांना उगाच वाइट वाटण्याची शक्यताही आहे.असे असले तरी विवाह सोहळ्यात पुढाऱ्यांचा सत्कार करावाच लागतो काय ? या प्रश्नाचे उत्तर कोणी तरी शोधण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे.रिंगण या सामाजिक अडचणीच्या विषयाला वाचा फोडू पहात असेल तर रिंगणचे कौतुक करायचे की शिव्या द्यायच्या हा अधिकारही भारतीय राज्य घटनेने आपणा सर्वाना बहाल केलाच आहे.

लग्न हे दोन जिवांचे , दोन परिवाराचे मिलन आहे.आणि या अशा इश्वरीय स्नेहबंधाच्या सोहळ्यात उपस्थित राहून वधू-वरास मनःपूर्वक आशीर्वाद , शुभेच्छा देणे , दोन्ही परिवाराचा स्नेह वृद्धींगत व्हावा या साठी प्रार्थना करणे , हे खरे तर मिञ आणि परिजनांचे कर्तव्य असते.मुळात आपणास लग्नाला बोलावण्याचा हेतूच ' आपले आशीर्वाद , आपल्या शुभेच्छा मिळाव्यात ' हाच असतो.पण अलिकडे लग्न सोहळ्याचा केंद्र बिंदू वधू-वर न राहता , लग्नाला आलेले पुढारी सोहळ्याच्या केंद्रस्थानी येऊ लागले आहेत आणि सोहळ्याचा नूरच पालटू लागला आहे.पुढाऱ्यांचे आगमन होताच , स्पिकरवरुन त्यांच्या आगमनाची वार्ता उपस्थितांच्या कानावर अक्षरशः फेकून मारणे , कार्यकर्त्यांची उगाच धावपळ , कँमेरामनचा फोकस पुढाऱ्यांवर , मध्येच हार तुरे ,आणि त्यानंतर फेटा -शाल -श्रीफळ.इथच हा प्रकार थांबत नाही तर अशा पुढाऱ्यांच्या सोबत दहा पाच मान्यवर कार्यकर्तेही आलेले असतात.त्यांचाही यथोचित सत्कार आयोजकाला करावा लागतो.हा सारा प्रकार अत्यंत प्रेमाने वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम लोकांना सहन करावा लागतो.विवाहा नंतर पुढाऱ्यांचे स्टेजवर जाणे , फोटो काढणे.उगाच वधू वराची ओळख करुन घेणे.इथेही हा विषय संपत नाही , तर विशेष कक्षात या मंडळींचे भोजन आणि भोजन संपल्यानंतर मंडपा बाहेर पाठवायला जाणे.

हूशsssss...

विचार करा बिचाऱ्या वर्हाडाचे काय होत असेल.आणि हेही ठरवा की असे पुढारी आल्याने , त्यांच्या शुभेच्छा मिळाल्याने वधू वरांच्या वैवाहिक जिवनात कोणत्या सुखाची भर पडत असेल ? 

आज माझे एक मिञ खास भेटायला आणि मुलीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आले.निघतांना आठवणींने म्हणाले " व्हाआयपी साठी ,स्वतंत्र व्यवस्था , सत्कार आहे बरं का, तुमच्या सहीत"....काय बोलावे ? 

या विषयावर कोणीतरी बोललेच पाहीजे.हा अनाठायी प्रकार थांबायला हवा , असे प्रयत्न झालेच पाहीजेत.या विषयावर पञकारांनी लिहणे खूप कठीण आहे.खूपच कठीण ! साक्षात अन्नदात्याचा अवमान केल्या सारखे ! 

मला वाटतं विवाह समारंभात सत्कार , कौतुक त्याचे व्हावे , ज्यांनी हा योग जुळवून आणला.हार तूरे त्यांना द्यावेत , ज्यांनी या विवाहास मोलाची मदत केली.पण हे असे भान कोणी बाळगावे ? खरं तर अशा सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या समस्त नेते मंडळीनी अशा सत्कारआणि विशेष व्यवस्थेला नकार द्यावा.सामान्य निमंञीता सारखे यावे,सामान्य आसनावर बसावे ,सामान्य पंक्तिला जेवावे.सामान्य निघूनही जावे.पण अशा चांगल्या गोष्टी करतील ते पुढारी कसले ?दुनियाच इव्हेंटेड झालीय राजे.काशी विश्वनाथाच्या आरतीत लक्ष न देता , हातात आरतीचे ताट घेऊन देवाकडे लक्ष न देता , नेते  फोटोवाल्या कडे पहातात.

यात दोषी वधू-वर पिता परिवारही असतो.पुढारी आल्याने आपले वजन वाढते , असा समजही त्यात समावलेला असतो.आता सुजान वाचकांनी , सजग नागरिकांनी , प्रवचनकार -किर्तनकारांनी या अनाठायी प्रकावर आवाज ऊठवून ही प्रथा बंद पडेल असे लोकजागरण केले पाहीजे.कृपया ही जबाबदारी पञकारावर टाकू नये.पोटापाण्याचा प्रश्न आहे.

                                  ---- राजू पाटील,औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या