बाहेरगावाहून लातुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कोरोना नियंत्रणासाठी मनपाची दक्षता

 

बाहेरगावाहून लातुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी

कोरोना नियंत्रणासाठी मनपाची दक्षता







 लातूर/प्रतिनिधी:कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात रहावी यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दक्षता घेतली जात असून याचाच एक भाग म्हणून रेल्वे आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून बाहेरगावाहून लातुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
  मागील काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.लातूर शहरात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मनपाच्या वतीने काळजी घेतली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
  कोरोनाचा आलेख लक्षात घेता पालिकेने कोविड केअर सेंटर सज्ज ठेवले आहेत. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून पुण्या-
मुंबईसारख्या मोठ्या शहरातून लातूर येथे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या केल्या जात आहेत.
   रेल्वेने लातुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मनपाच्या वतीने रेल्वे स्थानकावर एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर या पथकाकडून प्रवाशांची तपासणी केली जात आहे.खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दररोज कित्येक जण शहरात येतात.त्यामुळे पीव्हीआर चौक येथे खासगी ट्रॅव्हल्स मधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. एखाद्या प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
   मनपाच्या वतीने खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.नागरिकांनीही कोरोना संदर्भातील निर्बंध आणि आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या