मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे 'समाज वेध' काव्यसंमेलन संपन्न.

 मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे

'समाज वेध' काव्यसंमेलन संपन्न.





        अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन , नाशिक  येथे दिनांक २५ ,२६ आणि २७ मार्च २०२२ रोजी भरत आहे .दरम्यानच्या काळात ' सावित्री आणि फातिमाच्या लेकी ' या विषयावर ऑनलाईन कवयित्री संमेलन झाले त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .

            दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी ' समाज वेध ' काव्य संमेलन ऑनलाईन आयोजित करून संमेलनासाठी पोषक वातावरण निर्माण करीत कवी कवयित्रींना संमेलनासी जोडण्याचा अभिनव उपक्रम संयोजक समितीने आखला .या बद्दल संयोजकाचे मनापासून आभार .

            शेख शफी बोल्डेकर , हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ' समाज वेध ' काव्य संमेलनात २४ कवीनी आपला सहभाग नोंदविला. त्यावेळी प्रमुख अतिथी आणि स्वागत अध्यक्ष तन्वीर तांबोळी, शायर सय्यद जावेद अली - 'आगाज ' उपस्थित होते.  

               या कार्यक्रमाचे सूत्र संचालक डॉ.लियाकत नामोले यांनी आपल्या ओघवत्या भाषेत कांही कविंचा परिचय करून दिला. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे समन्वयक अरूण घोडेराव‌ यांनी आपल्या प्रास्ताविकात संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली .

        मराठी मुसलमान मराठीत लिहितो, त्यांना एकत्र करूनच ही चळवळ पुढे नेण्यासाठी हे संमेलन मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल असेही सांगितले. सद्य परिस्थिती पहाता सामाजिक धार्मिक वा इतरही घटना सारख्याच घडत आहेत, यातूनच आपणास मार्ग काढावा लागणार असल्याचे अरुण घोडेराव यांनी स्पष्ट केले .

   समाज वेध काव्यसंमेलनाची सुरुवात बार्शी- सोलापूरचे कवि शब्बीर मुलाणी यांच्या या कवितेने झाली ती कविता -

      'हिंदुत्वाचा ट्रेंड नवा हा 

      हिंदूमध्ये फूट पाडती 

      हिंसक बनून विष पेरती 

      वृत्ती सनातनी नको म्हणून समाजवेध काव्य संमेलन नाशिककरांनी केले आयोजन! नांदेडचे कवी जाफरसाहाब राजेसाहाब शेख यांनी चळवळीची कविता गाऊन सादर केली. 

 कवयित्री शबाना मुल्ला यांनी 

                   'आजवर हेच ऐकत आले 

                     तर मला सारेच कळते !'

म्हणत स्त्री भूमिका दमदार शब्दात मांडून श्रोत्यांना आश्चर्य चकित केले. सुभाष कंकाळ यांनी 'एकटा' ही कविता सादर केली. नाशिकच्या अनिल मनोहर यांनी  'मी कुणाला कोणता उजेड मागू' या सामाजिक आशयाची 'प्रदक्षिणा' ही कविता सादर केली.

      देऊळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या महेमुदा रसूल शेख यांनी ' मी झाले पोलिस, मन ठेवले ओलीस'  ही पोलीसांवरची कविता सादर करून पोलिसांबाबत आदर व्यक्त केला .

    या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक कविंनी सहभाग नोंदविला. सांगलीचे निसर्ग कवी मुबारक उमराणी यांनी 'जो होता हैं वह अच्छा होता हैं' ही कविता म्हणत काव्य संमेलनाची रंगत वाढवली. तसेच अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या कवयित्री दिलशाद यासीन सय्यद यांनी  'माय मराठी' कविता सादर करून मराठी भाषेला अभिजात दर्जा‌ मिळावा अशीच साद देण्याचा प्रयत्न केला आहे . 

         वाय.के.शेख यांनी 'अंगोरी' ही कविता सादर करून दारू विक्री करणाऱ्या मानवी नराधम म्हणत आपला राग व्यक्त केला. लातूरच्या कवयित्री तहसीन सय्यद यांनी ' उगी जन्माला आलो म्हणून जगायचे नसते' ही सामाजिक भान जागेवर आणणारी कविता म्हणत मानवी स्वभावाचे पैलू सादर केले .

       कोल्हापूरच्या प्राध्यापिका डॉ. मानसी पाटील यांनी 'लिहिता येते म्हणून लिहिता येत नाही' ही छोटीसीच पण आशय संपन् कविता सादर केली .

         नाशिकच्या अशोक भालेराव यांनी 'ओढू नका ही मतदारांनो खुर्ची माझी' ही कविता सादर करून सद्य राजकीय परिस्थितीकडे अंगुली निर्देश करून राजकीय सत्यता मांडली आहे, याची ही प्रचिती अनुभवता आल्याचे स्पष्ट जाणवले.

         दिलीप चव्हाण यांनी 'हे जग आहे अणुचे ना मनुचे' ही कविता सादर करीत श्रोत्यांची वाहवा मिळवली. अनिसा सिकंदर शेख यानी ' इस्लाम धर्माची शिकवण ' ही कविता सादर केली. या काव्य संमेलनात हाशम पटेल, रविंद्र देशमुख, कवयित्री आलियागोहर, रमेश सावंत, अरूण घोडेराव, लियाकत नामोले, डॉ.बेनजीर शेख यांनी ही कविता सादर करुन ' समाज वेध ' या काव्य संमेलनात रंग भरला .

             काव्य संमेलनाचे अध्यक्ष शफी बोल्डेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संमेलनाचा उद्देश विषद केला. मुस्लिम मराठी साहित्य वैश्विक आहे का? हा प्रश्न उपस्थित करुन 'मुस्लिम' हा शब्दच 'वैश्विक' असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की मुसलमान झाल्याशिवाय मुसलमान कळणार नाही. हे स्पष्ट  करीत‌ त्यांनी  ' आम्ही संत मुस्लिम ' आणि ' कशात आहे राष्ट्र हित ' या दोन कविता सादर केल्या .

            एकुणच अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी ' समाज वेध ' काव्य संमेलन घेऊन मुस्लिम मराठी साहित्यिक व साहित्य रसिकांची मने जुळवायचे मोठे कार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.लियाकत नामोले यांनी केले आणि प्राचार्य फारूख शेख यांनी आभार मानले. अशा प्रकारे आणि उत्साहाने ' समाज वेध ' काव्य संमेलन यशस्वी झाले .

          

                शब्बीर मुलाणी 

          शमा मंझिल , उपळाई रोड 

         बार्शी .जिल्हा- सोलापूर. ४१३४११

            मोबाईल - ८९७५७०१६०१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या