*लातूर आरोग्य खात्यातील नर्सचे ऑनलाइन फसवणुकीत गेलेले पैसे मिळाले परत.... लातूर सायबर पोलिसांची सतर्कता.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी लातुर आरोग्य खात्यात काम करणाऱ्या एका महिला नर्सच्या स्टेट बँक ऑफ इंडिया चा खात्यातून रक्कम 40,000/- रुपयेची फसवणूक झालेली होती.
सदर महिलेला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून त्यांच्या मोबाईल मध्ये स्क्रीन शेअर होणारे एनीडिक्स, टीमविवर अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले व त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मोबाईल मध्ये येणाऱ्या ओटीपी तथा गोपनीय माहितीचा आधार घेत त्यांची चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली होती.
तक्रारदार महिला यांनी तात्काळ सायबर सेल, लातूर येथे संपर्क साधला. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री .अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, सपोनि सुरज गायकवाड, पोलीस अमलदार गणेश साठे, संतोष देवडे, शैलेश सुडे, महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड यांनी सदर तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करीत संबंधीत वॉलेटच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदरचे फ्रॉड ट्रांजेक्शन थांबविले. त्यावरून सदर महिलेचे चाळीस हजार रुपये वाचवण्यामध्ये सायबर सेल लातूर यांना यश मिळाले आहे. सदरची रक्कम संबंधित तक्रारदार महिलाच्या खात्यात जमा झाली आहे.
आज रोजी नमूद प्रकरणातील तक्रारदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन सायबर सेल प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर तट यांचे व त्यांच्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले असून नागरिकांनी जागरूक होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या बँक खात्याशी निगडित कोणतीही संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये असे आवाहन सायबर सेल लातूर यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.