अन्नात विश कालवणारी जमात
माझे अब्बू आंबाजोगाईत गेली ४० वर्षे झाली शिलाई काम करतात. त्यांचा सर्व ग्राहक लोमटे, कुलकर्णी, दायमा, देशपांडे, दामा, जोशी, भोसले, देशमुख, लाटकर, पटाईत, थाटकर आहे... गेली चार दशकं त्यांचा ग्राहक टिकून आहे.
लेकी, सुना, नातवंडे सगळेजण बाबांकडे कपडे शिवायला येतात. सगळेजण आम्हा भावंडांना नावानिशी ओळखतात.
आमचा सर्व किराणा बाबांचे मित्र पिलाजी काकाकडे असतो, त्यासही ३० वर्ष झाली.
गल्लीतल्या चवरे काकू गेली ३० वर्षे आम्हाला दूध आणून देतात. आमचं दळण गेली २५ वर्षे सुनील (माळी) दादा दळतोय; ते वार्षिक उधारीवर!
आमचे एक दुकान मालक ब्राह्मण होते, त्यांच्याकडे आम्ही तब्बल २० वर्षे भाडेकरू होतो. त्या पुसकर काकांनी एक तारखेला भाड्याबद्दल कधीही आग्रह धरला नाही. आजही त्यांच्या कुटुंबियाबरोबर आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
बालपणी सुमन काकू अनेकवेळा घरून स्वयंपाक करून आणून आम्हाला जेवू घालायच्या, आजही घरात चांगलं शिजलं तर त्या हमखास आणून देतात. अम्मीनंतर सुमन काकुंच्या हातची चव आम्हा भावंडांना आवडते.
२० वर्षे आमचे फैमिली डॉक्टर दबडगावकर होते. किरकोळ आजारासाठी आम्ही गुप्ता (हे आरएसएसचे व कर्मठ हिंदुत्ववादी होते, कोविडने गेल्यावर्षी निधन पावले), काळेगावकर यांच्याकडे जातो. आमच्या अम्मीला काळेगांवकरचा गुण येतो, त्यामुळे ते दुसरा डॉक्टर नको म्हणतात.
आमचे दाताचे डॉक्टर काळे आहेत. त्यांच्याकडे ताई, आई, बाबा, भाऊ, मी सगळेजण ट्रिटमेंट घेतो. आमचे डोळ्याचे डॉक्टर खेडगीकर आहेत. गेली दोन पिढी आम्ही त्यांच्याकडे उपचार घेतो.
पुण्यात वाघमारेंच्या केयर नर्सिंग होममध्ये बेगम नित्य जाते.
किराणा बालाजीमधून भरतो. दूध एका राजस्थानीकडून घेतो. नाथ मेडिकलवाला अर्ध्या फोन लावला तर प्रिस्क्रिप्शन पाठवतो. आम्ही सहकुटुंब शॉपिंगला डी मार्ट, एसएफएसला जातो. जेवायला मुरलीधर किंवा आशा डायनिंगला जातो.
मी तीन-चार नॉन मुस्लिम क्लाइंटसाठी कंटेटचं काम करतो, जे मला रोजीरोटी देतात. मी तीन टाईपिस्टला जॉबवर्कचं काम देतो, जे अमुस्लिम आहेत.
दुर्दैव असं की हे सगळं सांगावं लागतं. कारण सुनील चव्हाणके सारखी नीच प्रवृत्तीची माणसं सहजीवनामध्ये विश कालविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक विषयामध्ये हिंदू-मुस्लिम शोधणाऱ्यांनी आता खाण्याच्या बाबतीतही घाण पसरवण्याची विकृती सुरू केलीय. अशा विखारी लोकांचा करावा तेवढा निषेध कमी आहे.
कलीम अजीम, पुणे
१४ एप्रिल २०२२
#hatespeech #HinduMuslim #hateAjenda #MuslimlivesMatter #मुस्लिम #सहजीवन #Communalism
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.