लातूर जिल्ह्यात यापूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापन अनुभवाचे प्रतिबिंब कोरोना व्यवस्थापनात दिसते : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लातूर,दि.26 (जिमाका):- लातूर जिल्ह्याला यापूर्वी भूकंप सारख्या आपत्तीचा सामना करावा लागला होता. तेव्हाही अनेक कुटुंबांमधील विधवा महिलांना विविध पातळ्यांवर आधार आणि मदत देण्यामध्ये या जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी केली होती.
गेल्या दोन वर्षात कोवीडच्या काळामध्ये अशाच प्रकारे काम करून अनेक कुटुंबातील निराधार लहान मुले व विधवा महिला यांच्यासाठी पुन्हा एकदा काम करण्याचा प्रसंग आला. मात्र जिल्हा प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध रीतीने काम करून अधिकाधिक प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे मनाला आनंद होत आहे. असे लातूर जिल्हा प्रशासनाचे कौतुक आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
शहरी भागातील वनव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन,धर्मादाय रुग्णालये , महिलांसाठीच्या रुग्णालयातील सोयी सुविधा अशा विविध मुद्द्यांकडे आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश टाकला.
लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज, महानगरपालिका चे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि आरोग्य, शिक्षण, परिवहन, कृषी, कामगार कल्याण, महिला बाल विकास अशा विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज लातूर येथे घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी बी. पृथ्वीराज यांनी जिल्ह्यामध्ये कोरोना काळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येकी रुपये पाच हजार रुपयाची मदत झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोरोना मुळे विधवा झालेल्या महिला आणि निराधार झालेले मुलांना देखील आर्थिक मदत केल्याची माहिती दिली.
मिशन वात्सल्य मध्ये बैठक घेऊन सर्व योजनांचं एकत्रीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. गरजू कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक ती मदत केली आहे. सातबारा व इतर अन्य कागदपत्रे मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये शिबिर घेऊन प्रयत्न केला आहे.
संजय गांधी निराधार योजना .. अनाथ मुलांसाठी बाल संगोपन योजना ..संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळवून देण्यासाठी कायदेविषयक सल्ला सेवा ची मदत घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोना काळात २७०० मृत्यू झाले होतें त्यांना शासनाकडून प्रत्येकी ५०,०००/- ची मदत मिळवून देण्यासाठी यंत्रणा काम केले आहे. काही लोकांना मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक निराधार मुलांना ११०० रुपयांची मदत बाल संगोपन योजना मध्ये दिली आहे.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी वर्षा पवार यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली आणि विधवा महिला यांना समुपदेशन, कायदेविषयक सेवा आणि आर्थिक मदत देण्यासाठी विभाग पुढाकार घेत असल्याचे यावेळी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्याची आणि त्याद्वारे समाजाला मानसिक ताकद देण्याची ही एक चांगली यशोगाथा असल्याचे सांगून त्यांच्या या कामाबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या महिन्यात विविध कामांचा आढावा घेऊन त्याचा एकत्रित अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
जिल्ह्यामध्ये रिक्षा चालकांना अनुदान म्हणून ४४ लाख वाटप करण्यात आले आहे. तसेच बांधकाम मजुरांना ९.२१ कोटी, घरेलू कामगारांना ११ लाख सानुग्रह अनुदान वाटप केले आहे. डॉ गोऱ्हे यांनी दि २७ एप्रिल ते १० मे दरम्यान असंघटित कामगारांच्या ऑनलाईन नोंदणी साठी मोहीम घेण्याच्या सूचना कामगार विभागास दिल्या.
उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपसभापती यांची दूरध्वनीवरून संपर्क साधून बैठकीला उपस्थित राहता न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उस्मानाबादमधील बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांसह मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.