जीवनाला स्वच्छ करणारा महिना "रमज़ान"

 जीवनाला स्वच्छ करणारा महिना "रमज़ान"




बशीर शेख ’कलमवाला’

जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एवढं की प्रेषित सल्ल. म्हणाले, ’स्वच्छता अर्धे ईमान आहे.’ आणि रमजान जीवनाला स्वच्छ करणारा महिना आहे. स्वच्छ या शब्दात समुद्राएवढी खोली आणि आकाशाएवढा विस्तार लपलेला आहे. त्यामुळे ईमानधारकाला रमजान कसं स्वच्छ करू इच्छितो ते पहावे लागेल. स्वच्छता ऐहिक आणि पारलौकिक जीवनासाठी यशस्वीतेचे द्वार आहे.

 माणसाचे बाह्य आवरण सुंदर दिसत असेल तर ती व्यक्ती अनेकांच्या नजरेची आवडती बनते. किंबहुना त्याच्याजवळ जाण्याला कोणीही कचरत नाही. कारण त्याची स्वच्छता टापटीपपणा नजरेला भुरळ घालते. असेच जर एखाद्या व्यक्तीचे अंतरंगही स्वच्छ असेल तर ती व्यक्ती लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांची आवडती बनते. मग हे बाहृरूप आणि आंतरूप स्वच्छ करण्याचे प्रशिक्षण कुठे मिळते का? तर मी म्हणेन हो मिळते. ते रमजानमध्ये. खरंतर कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण योग्यरीत्या मिळाले तर त्यात पारंगत होणे फार सोपे जाते. उदा . डॉक्टर होण्याचे प्रशिक्षण जर चांगल्या पद्धतीने मिळाले तर पदवी पूर्ण झाल्यानंतर रुग्णांचे निदान लवकर होते. शिवाय प्रशिक्षण घेऊन घरीच बसले पण पुढे रुग्णसेवा नाही केली तरी शिक्षण विसरून जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. 

 मी हे उदाहरण का दिले त्याचे कारण हे की, आंतर आणि बाह्यअंग स्वच्छ करणार्‍या प्रशिक्षणाचा महिना सुरू झाला आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, ’रोजा शरीर अन् मन दोन्ही शुद्ध करतो.’   

 रोजाबद्दल प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, रोजा ढाल आहे आणि तुमच्यापैकी कोणी रोजाच्या स्थितीत असेल तर आपल्या जिभेने कुठलीही वाईट गोष्ट बोलू नये आणि कोणी गोंधळ व धिंगाणा घालत असेल आणि कोणी आपल्याशी शिवीगाळ करेल अथवा भांडणावर येईल, तर रोजेदाराने विचार करावा की मी तर रोजेदार आहे. बरं मी कसं शिवीगाळीला उत्तर देऊ शकेन, कसं भाडणं करू शकेन) (बुखारी मुस्लिम.) या हदीसमधून रोजेदाराने किती संयम बाळगावयास पाहिजे, हे स्पष्ट होते.  माणसाला जीवनाचा अर्थ रमजान समजावतो. जीवन जगण्याची कला दाखवितो. 

आपल्या अंतरंगात बिघाड करणार्‍या गोष्टी- 

1. बेशिस्तपणा. 2. खोटे बोलणे

3. विनाकष्टाचा पैसा स्वीकार्ह करणे. (भ्रष्टाचार, मटका,जुगार, व्याज़) 4. खाण्यापिण्यात शिस्त नसणे 5. व्याभिचार करणे 6. मने दुखावणे

7. चहाडी करणे 8. भांडण तंटे करणे

9. रागावर नियंत्रण नसणे 10. दारू पिणे

11. गुन्हेगारी कृत्य करणे आदी.

 या व अन्य बाबी ज्या मानवी जीवनात व्यत्यय आणतात, त्याला दु:खात लोटतात अशा सर्वांवर कशी मात करायची याचे प्रशिक्षण रमजान देतो. रमजानमध्ये मुख्यतः या गोष्टी प्रकर्षाने केले जातात. 1. उपवास करणे (अशा सर्व गोष्टींपासून दूर राहणे ज्या उपवासाला कमकुवत बनवितात. उदा. वर दिलेल्या 11 गोष्टींपासून दूर राहणे, उपवासादरम्यान अन्न, पाणी वर्ज्य) 2. कुरआन पठण करणे (समजणे, चिंतन करणे) 3. पाच नमाज व्यतिरिक्त तरावीहची अतिरिक्त नमाज काटेकोरपणे अदा करणे (जी 20 रकाअत असते). 4. प्रार्थना, जप करणे 5. जकात (जकात कमाईचा 2.5 टक्के रक्कम दान करणे) देणे 6. सदका करणे (दान देणे) 7. फितरा देणे. घरातील प्रत्येकाच्या नावाने पावणे दोन किलो गहू अथवा त्याची रक्कम गरजवंतांमध्ये वाटणे. या तिन्ही गोष्टी एकच वाटत असल्या तरी वेगवेगळ्या आहेत. 

 सदरील 7 बाबी प्रत्येक इमानधारकास रमजानमध्ये पाळणे अनिवार्य आहे. मला सांगा उपवासादरम्यान माणसाला भुकेची तीव्र जाणीव होते. यामुळे गरिबीची जाणीव होते. जसे शारीरिक व्यायाम करताना शरीर मजबुतीकडे वळते तशाच पद्धतीने उपवासही शरीराचा व्यायाम आहे. यामुळे शरीरातील अनावश्यक पेशी जळण्यास सुरूवात होते. काही ताजेतवाण्या होतात. आतड्यांना आराम मिळतो, शरीराला अन्नाची किती गरज आहे याचे महत्त्व पटते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित कार्यान्वित राहतात. शास्त्रज्ञांच्या मते तर रोजामुळे कॅन्सरसारखे आजार दुरूस्त होतात. कुरआन पठणाने आत्मिक समाधान मिळते. त्यास समजून वाचल्यानंतर जीवनाचे रहस्य उलगडते, मार्गदर्शन मिळते, माणूस विचार करायला लागतो. यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे रहस्य उलगडते. जी व्यक्ती रोजा ठेवते, तरावीहची नमाज महिनाभर अदा करते, तिचे शरीर सदृढ बनल्याशिवाय राहत नाही. प्रामाणिकपणे रोजे करणार्‍यांची प्रतिकारशक्ती कमालीची वाढते. या गोष्टी मानवी जीवनाला ताजेतवाणे करतात. यामुळे अल्लाहने रमजान इमानधारकांसाठी एक देणगीच दिली आहे, जी मानवी सद्गुणांना उभारते आणि दुर्गुणांपासून दूर ठेवते. जर रोजेदाराने या महिन्यात मिळालेल्या खडतर प्रशिक्षणाची शिदोरी सोबत जपून ठेवली तर पुढील रमजानपर्यंत म्हणजे 11 महिने ही ऊर्जा त्याला सद्वर्तनासाठी तसेच सुदृढ ठेवण्यासाठी पुरेशी ठरते. मात्र जी व्यक्ती सदरील उच्च कोटीचे प्रशिक्षण घेऊनही आपल्यात बदल करत नाही तो मी म्हणेन आपल्या जीवन, समाज आणि देशासाठी ओझे आहे. तो सर्वांसाठीच नुकसानदायक ठरेल. म्हणजे जो स्वतःचा होऊ शकत नाही तो इतरांचा काय होईल. 

 ईश्‍वराची इमानवंतांकडून अपेक्षा...

 कुरआनच्या सुरे आले इमरान आयत नं. 110 मध्ये अल्लाह ईमानधारकांना उद्देशून म्हणत आहे की, ”आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.”  

 सदर आयातीमध्ये ईश्‍वराने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी इमानधारकांना अस्तित्वात आणले गेले आहे. अल्लाहने इमानवंतांना रमजानचे प्रशिक्षण दिले आहे. ज्यामध्ये मनुष्य सद्वर्तनातून दुसर्‍याच्या भल्याचे विचार आपल्या अंगी बाळगतो. वाईटापासून दूर राहतो आणि चांगल्या कर्माकडे आकर्षित होतो. फक्त होतच नाही तर तो दुसर्‍यांनाही याची प्रेरणा देतो. त्यामुळे सदर आयातीच्या परिपेक्षात अल्लाह जो इमानवतांकडून अपेक्षा ठेवतो, तो फक्त सांगून थांबत नाही तर ते कसे करायचे याचे यथोचित मार्गदर्शन, प्रशिक्षणही देतो. 

 त्यामुळे माझे समस्त ईमानधारकांना आवाहन आहे की, मित्रांनों! रमजान फक्त उपाशी तपाशी राहण्याचे, खाण्या पिण्याचे, चांगले कपडे परिधान करण्याचे नाव नाही तर एका मोठ्या उद्देशासाठी रमजानच्या माध्यमातून तुमची निवड करून तुम्हाला तयार केले जात आहे, याची जाणीव ठेवा, यावर विचार करा आणि रमजानच्या खडतर दिनचर्येसाठी स्वतःला तयार करा. कुरआनला समजून वाचा. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जीवन चरित्र एकदा वाचून काढा. तुम्हाला समजेल की रमजानच्या प्रशिक्षणातून प्रेषित सल्ल. आणि सहाबा रजि. कशा पद्धतीने सत्याकडे वळत होते. वाईट मार्गापासून लोकांनाही परावृत्त करत होते. कोणावर अन्याय अत्याचार करत नव्हते, कोण करत असेल तर त्याला समजावत/ प्रतिकार करत होते. अल्लाहकडे दुआ आहे की, मला व सर्व लेख वाचणार्‍या वाचकांना रमजानचा हक्क अदा करण्याची, जीवन सन्मार्गाने जगण्याची सद्बुद्धी दे. आमीन...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या