पुस्तक प्रकाशनच्या निमित्तानं*

 *पुस्तक प्रकाशनच्या निमित्तानं* 

( Who killed Judge Loya ? )





     लोकसभा, न्यायपालिका, प्रशासन व प्रसारमाध्यमे ही लोकशाहीतील चार प्रमुख स्तंभ होत. काही तुरळक बोटावर मोजण्याइतके लोकांनी आपल्या हव्यासा पोटी या स्तंभाला सुरूंग लावले आहे. दुर्दैवानं आज हे स्तंभ ढासळत आहेत. सरन्यायाधीशांची अगतिकता तर सर्व जगानं पहिलीच आहे. प्रशासकीय अधिकारीदेखील स्वतःला यांच्या दावणीला बांधून घेतले आहे. न्यायालयाचा मनाई हुकूम असताना बुलडोझर चालवून त्यांनी ते दाखवून दिलेच आहे. रोज आपणासमोर लोकशाहीची पायमल्ली होताना दिसत आहे. सेलीब्रिटी पासून  सर्वसामान्य माणूस अगदि हतबल झाला आहे. हा वारू अराजकच्या दिशेनं प्रचंड वेगात, सुसाट, बेलगाम धावत आहे. गांधीवादी नेहरूवादी म्हणा वा देशवादी हे या काळोखात चाचपडत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. जवळपास सर्वच जणांनी आपापले हत्यार मॅन केले आहेत वा गहाण ठेवून मूकदर्शक बनले आहेत. जो कोण आवाज उठविण्याचा प्रयत्न करतो त्याला हा वारू नेस्तनाबूद करून सोडत आहे.

       काय कराव जेणे करून देशाला या विध्वंसक व विनाशक गोष्टींपासून दुर सारता येईल, व पुन्हा आपला देश सुजलाम बनेल, याच विवेचनात एक गट "फुल ना फुलाची पाकळी" या धोरणानुसार आपआपल्या परीनं या बिकट परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

     काही सुविचारी व समविचारी लोक आपआपल्या परीनं डागडुज करीत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांच्या "हू किल जज लोहिया" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. संयोजक युवक क्रांती दल व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांनी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी व प्रमुख उपस्थिती निरंजन टकले आणि माजी पोलीस प्रमुख मुश्रीफ हे होते. तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन संदीप यांनी केल. असल्या कार्यक्रमाने मुरकुंडीला आलेल्या समाजाला नवीन संजीवनी मिळेल हे मात्र नक्की. 

       संदीप बर्वे यांच्या शब्दा शब्दांतून त्यांची प्रतिभा दिसून येत होती.

स्वगत, प्रस्तावना व समारोप अत्यंत सुलभ सुंदर सूत्रसंचालन. निरंजन सरांबरोबरचा संबंध व समविचारी असल्याची भावना नैसर्गिक रीत्या मांडलाय. 

     समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले डाक्टर कुमार सप्तर्षी यांनी आपल्या भाषणातून हे पुस्तक एक 'रहस्य-कथा' असल्याचे नमूद करून, पुस्तकातील जवळपास सर्वच घटकांवर सविस्तर माहिती फारच रोचक पध्दती ने मांडली. ते स्वतः डॉक्टर असल्याने हार्ट-अ‍ॅटॅक, पोस्टमार्टेम व नंतरच्या कार्यपद्धतीवर चांगलाच समाचार घेत येणाऱ्या काळातील धोके स्पष्ट शब्दात मांडले. लवकर काही तरी करायला पाहिजे नाही तर भविष्यात असले लिखाण व असले कार्यक्रम घेता येईल की नाही याची शाश्वती नसल्याचे कटुसत्य अधोरेखित करत, आपल्या शैलीतून खास करुन मध्यमवर्गीयच बदल घडवून आणू शकतात यावर जोर देऊन त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आव्हान केले.

      व्यवस्थेवर कडाडून हल्लाबोल करतांना ' हिन्दूंना मारणारं व जिथं हिंदूच असुरक्षित असलेले हे कसले हिंदुराष्ट्र', 'लोहिया चा लोचा होईल', 'माणसं मारण्याचा धंदा', 'आदेशानुसार वागणारे नैतिक अनैतिक विचारत नाहीत' 'सत्य बोलने राष्ट्रद्रोह कसा', व 'सत्य बोलतात त्यांनी जपून राहावे' असल्या शब्दांनी हजर सर्वांनाच विचार करण्यास प्रवृत्त करतानाच कार्यक्रमाला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले. 

      माजी पोलीस प्रमुख मुश्रीफ सरांनी निरंजन सरांच्या पुस्तकावर थोडेच बोलणं पसंद केले. त्यांना पुस्तक मिळालंच नाही, त्यांनी ते वाचलेच नाही. हि सबब पटण्या सारखी नाही. आपल्या पुस्तकांविषयी माहिती व आव्हानांचा पुनरःउल्लेख केला. त्यांच्यावर चालू व्यवस्थेची दडपणं असावीत याची पाल पाल चुकचुकली.  कारण ते पुर्वीच्या आवेशात आज दिसले नाहीत.

     आवाजहीनांना आवाज देण्यासाठी स्वतःशीच वचनबद्ध असलेले ध्येय-वेडे ( पनवेलचे आमचे मित्र ऐ.के शेख नेहमी म्हणतात - शहाणं व्यवहार करतात, वेडे असले काम करतात) निरंजन यांच्या शोध-पत्रकारितेचे विषय नेहमीच टोकदार व प्रवाहांच्या विरूद्ध असल्यानेच अधिकच उठावदार व लक्षवेधी ठरतात. यावेळेस पण असच योगायोगानं मित्रांकडून ( जयंत सोनावणे, मानस पगार ) मिळालेली बातमी व त्यानंतरचा आजपर्यंत चा प्रवास फारच रोचक पणे सांगताना, पंगा कोणाबरोबर घ्यायचा, तो कोण, किती ताकदवान, त्याची पावर काय या सर्व गोष्टी गौण ठरतात जेंव्हा त्यांना काहितरी चुकीचं झाल याची जाणिव होते. 

      बलाढ्य, महाभयंकर, सत्ताधीशाचा पर्दाफाश करताना कोणकोणत्या थरारक प्रसंगातून जावे लागलं याचा धक्कादायक, उत्कंठावर्धक व अनपेक्षित प्रसंगाचा प्रवास मांडताना एक एक प्रसंगातून अंग शहारून येत होते. 

     विकत घेतलेले बळ असत्याच्या बाजूनेच लढत असते. त्यात दिखावा ज्यास्त आणि आत्मसमर्पणाचा अभाव असून ते क्षणभंगुर असते, सापा पेक्षा पिलावळेच जास्त घातक व आक्रमक दिसतात, पण जेंव्हा त्यांच्याबरोबर आपण दोन हात करण्याची तयारी करतो अगदी त्याच क्षणी ते मिळेल त्या बिळात भिऊन लपवून बसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निरंजन यांचा होत असलेला पाठलाग व त्या नंतर ची प्रतिक्रीया.

      पिडीत परिवाराची अगतिकता आणि भयग्रस्त वातावरणातील मुलाक़ातीचा प्रसंग फारच भावुक अंगावर रोमांच आणणारा आहे. नोटबंदी त्यातून निर्माण झालेली कुचंबणा, प्रशासकीय व अन्य लोकांकडून कागदपत्र जमवाजमव करण्यात आलेली लबाडी, साथीदाराने केलेली धोखाधडी, प्रकाशकांकडून झालेला धुमजाव, ISBN नंबरवरून झालेला आडमुठ धोरण असले किती तरी प्रतिकूल परिस्थितीवर वर मात करून हे पुस्तक आले आहे.

     हे खरेच की ढिम्म अंधारातून मार्गक्रमण करायचाच होता पण सोबत आपल्याला प्रोत्साहन देणारी आपली बहीण, उस्मानाबादचे कुलकर्णी, 

औरंगाबादचे डाक्टर मिन्ने यांचे गांधी स्मारक निधीचे मित्र, धम्मगंगा प्रकाशन, मध्यरात्रि रिपोर्ट देनारे त्यामुळेच विस्थापित झालेले मेडीकल ऑफिसर असले कितीतरी ज्ञात-अज्ञात कवडसे सोबत होते यांचा ही खारीचा वाटा असल्याची कबुली छानच. 

      मुखपृष्ठावरील चित्राची समीक्षा हा एक वेगळाच लेख लिहावा लागेल. उघड-गुपित सांगणारे असेच आहे. चित्रकार नागेश टिकले यांच्या कल्पनेतून व परिश्रमातून आकारास आले आहे. मी मुद्दाम निरंजन सराना  सांगू इच्छितो, त्याचे मानधन हे त्याचे आपल्या व आपल्या कामावरच्या प्रेम व आदराचे प्रतीक आहे. तो आपल्या कलाच मुल्य जाणून आहे. 

       पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या प्रत्येकालाच हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल यात काही वादच नाही. प्रकाशन सोहळ्यातील पाऊणे दोन तासातचा हा  लेखाजोखा तो पुस्तकातील बर्‍याच ठळक गोष्ट वगळून जिज्ञासा पोटी लिहलेला असा आहे, तर पुस्तक कसे असेल, हे पुस्तक प्रत्येक सुविचारी लोकांना विचार करण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.

     

             इंतेखाब फराश 

                  संपादक 

      स्पंदन बहुभाषिक त्रैमासिक 

             ९५०३८०१९९९

•••••••••••••••••••••••••••••••

पुस्तकाचे नाव- हू किल जज लोया 

लेखक- निरंजन टकले

प्रकाशक-धम्मगंगा प्रकाशन औरंगाबाद 

ISBN- 9788195654802

मुल्य- ४५०-/₹




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या