उजनीच्या शेतकर्यांची विनयभंग,
अॅट्रासिटीच्या आरोपातून मुक्तता
लातूर, दि. १८ (प्रतिनिधी) : उजनी (ता. औसा) येथील शेतकऱ्याच्या विरोधात अॅट्रासिटीसह जातिवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी भादा पोलिस ठाण्यात चार वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सरकारपक्ष आरोपीविरूद्धचे आरोप सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयाने आरोपी शेतकर्याची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती अॅड. बी. एस. कुटवाडे यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी : औसा तालुक्यातील उजनी- आशिव शिवारात शेत असलेले गुणवंत त्रिंबक वळके यांनी त्यांच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी येऊ नका असे सांगितल्याने त्याचा मनात राग धरून एका महिलेने संबधित शेतकर्याच्या विरोधात भादा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शेतात येण्यास मज्जाव केल्याने दिलेल्या तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून विनयभंग केल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी भादा पोलिसांनी दि. ११ मार्च २०१८ रोजी अॅट्रासिटी व भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी गुणवंत वाळके यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून घटनेशी संबधित साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्ष व बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाने घटना घडलीच नाही व शेतात येण्यास मज्जाव केल्याने मनात राग धरून खोटी फिर्याद दिल्याचे न्यायालयात सांगितले. सरकार पक्ष त्यांचे आरोप सिध्द करू शकला नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून आरोपी गुणवंत वाळके यांची जातीवाचक शिवीगाळ (अॅट्रासिटी), मारहाण व विनयभंग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी आरोपीच्या वतीने अॅड. बी. एस. कुटवाडे यांनी काम पाहिले. अॅड. अरविंद रेड्डी, अॅड. ए. सी. गिड्डे, अॅड. एस. व्ही. कराड, अॅड. इ. एम. सय्यद यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.