घुगी येथे वीज पडून बैल ठार
उस्मानाबाद शहर व परिसरात तसेच जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी दि. 19 मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह, विजेच्या कडकडाटासह तासभर मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील घुगी येथे वीज पडून शेतकर्यांचा बैल ठार झाला आहे. काही भागात आंबा बागांचे नुकसान झाल्याचे शेतकर्यांतुन सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या पावसाने उस्मानाबाद शहरातील व्यापारी व फेरीवाल्यांची धांदल उडाली आहे. पाऊस होताच उस्मानाबाद शहरातील विज पुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी दिवसभर प्रचंड उकाडा व ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळासह पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाटही सुरुच होता. एक तासभर पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली, राजुरी, कामेगाव, समुद्रवाणी, घुगी, मेंढा या भागात विजेच्या गडगडाटासह दमदार पाऊस झाला आहे. घुगी येथील एकनाथवाडी वस्ती येथील शेतकरी तानाजी सुभाष जावळे यांचा बैल वीज अंगावर पडल्याने ठार झाला आहे. बाभळीच्या झाडावर वीज पडली होती. बैल बाभळीच्या झाडाला बांधला होता. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. जिल्ह्यात आंबा फळबागा मोठ्या प्रमाणावर असून वादळी पावसाने झाडावरील आंबे मोठ्या प्रमाणावर गळाले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.