बालकामगारांना जोखीमच्या ठिकाणी कामावर लावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. 02 बालकामगारांची सुटका. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई*

 *बालकामगारांना जोखीमच्या ठिकाणी कामावर लावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. 02 बालकामगारांची सुटका. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई*





       लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो



   लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून,बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते. बालकांना कामावर ठेवू नये. असा कायदा असूनही  सर्रास बालकांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जाते. बालमजुरी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी बालमजूर नियमन व निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी निर्देशित केले होते.

              त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील विविध आस्थापनात काम करणाऱ्या बालकामगारांची माहिती घेत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्या नेतृत्वातील पथकाने जुनी एमआयडीसी, लातूर येथील प्लास्टिक बूट व चप्पल बनविणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकला. तेव्हा तेथे दोन अल्पवयीन मुले अतिजोखीमीचे काम करीत असताना मिळून आले‌. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, लातूर येथील निकी बारच्या पाठीमागे असलेल्या पठाणवाडी परिसरात राहणारा व सदर कारखान्याच्या व्यवस्थापक सद्दाम नाझीम काझी याने नमूद अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून कारखान्यामध्ये मध्ये कामाला लावले आहे. अशी माहिती दिली.

                 नमूद कारखान्याच्या व्यवस्थापकाने बाल कामगाराकडून कमी वेतनात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कारखान्यामधील धोकादायक मशिनरीच्या ठिकाणी बालकामगार म्हणून नियुक्त करून अतीश्रमाचे काम करून घेऊन मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचे निदर्शनास आले.यावरून 


1) सद्दाम नाझीम काझी, वय 34 वर्ष, राहणार पठाणवाडी, निक्की बार च्या पाठीमागे लातूर.


                    याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2023 कलम 3(A),14 बालकामगार प्रतिबंध अधिनियम 1986, तसेच 75 व 79 अल्पवयीन न्याय कायदा 2015 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही  बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे.

                सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपाधीक्षक सुनील गोसावी यांचे नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, मनियार, महिला पोलीस अमलदार वंगे, लता गिरी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या