*23 कोटीच्या अपहार प्रकरणामधील मुख्य आरोपीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुस्क्या. पोलिसांनी वेशांतर करून केली कारवाई.*
लातूर रिपोर्टर न्यूज़
याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी 2023 मध्ये शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांचे कडून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यांमधील फिर्याद प्रमाणे "जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असलेला मनोज फुलबोयने याच्याकडे शासकीय बँक खात्याचा अभिलेख लिहिण्याची जबाबदारी होती. याचाच गैरफायदा घेऊन, कट रचून शासकीय बँक खात्यातून पैसे काढून सदरची रक्कम गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरुण नागनाथ फुलबोयने याच्या तन्वी ॲग्रो एजन्सी फॉर्मच्या नावाने असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्याचा डाव रचण्यात आला होता. आरोपींनी ठरविलेल्या कटाप्रमाणे कामास सुरुवात करून तनवी अग्रो एजन्सी नावाचे फॉर्म उघडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून असलेल्या मनोज फुलबोयने याने बनावट RTGS (आरटीजीएस) प्राधिकारपत्राच्या आधारे तनवी अग्रो फार्मच्या नावाने रक्कम वर्ग केल्या व शासनाची फसवणूक करण्यात आली"
अशाप्रकारे गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपये रक्कम शासकीय बँक खात्यातून काढून अपहार करण्यात आला. त्या अपहारातील रकमेपैकी जवळपास 14 कोटी रुपये रक्कम ही तन्वी ॲग्रो फार्म च्या नावाने वर्ग करण्यात आली होती. असे निष्पन्न झाले होते.आणि सदर फार्मचा प्रोप्रायटर अरुण नागनाथ फुलबोयने हा गुन्हा घडल्यापासून म्हणजेच मागील पाच महीण्यापासून फरार होता. तो दर दोन-तीन दिवसाला राहण्याचे ठिकाणे व संपर्क क्रमांक बदलत असल्याने पोलीस पथकांना मिळून येत नव्हता. त्यावर पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्याच्या तपास करीत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदाराच्या पथकाला नमूद आरोपीचा कसून शोध घेऊन अटक करण्यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अरुण फुलबोयने हा राहात असलेल्या व वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणांना अतिशय गोपनीय पद्धतीने भेटी देऊन त्या ठिकाणी गुप्तबातमीदार नेमण्यात आले होते. सदर बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून नमूद आरोपीला अटक करण्याची योजना तयार करण्यात येत होती.
दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला बातमीदाराकडून विश्वासनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की, आरोपी अरुण फुलबोयने हा औरंगाबाद व परिसरात असून औरंगाबाद जिल्हा रुग्णालय परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक 24/05/2023 रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदाराचे पथक लागलीच औरंगाबाद येथे रवाना होऊन, नमूद आरोपी अतिशय चपळ व हुशार असल्याने तो पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस पथकातील अंमलदारांनी डॉक्टरांचा वेश परिधान करून जिल्हा रुग्णालयात सापळा लावला.
काही वेळानंतर सापळा लावलेल्या ठिकाणी एक संशयित इसम वावरताना दिसला त्यावेळी डॉक्टराचे वेशांतर केलेल्या पोलिसाने त्या संशयित इसमास *"अरुण"* नावाने हाक मारली त्यावेळी त्याने *"डॉक्टरसाहेब बोला ना!"* अशी साद दिली. त्यावेळी डॉक्टरांच्या वेशातील व सापळा लावून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी नमूद आरोपीला ताब्यात घेऊन आपण पोलीस असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपी अरुण फुलबोलणे हा हवालदिल होऊन डॉक्टरांच्या वेशातील पोलिसाकडे पाहतच राहिला होता. अरुण फुलबोयने यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता लातूर येथे आणून न्यायालयात हजर केले असता त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
23 कोटी रुपयाच्या अपहार मधील अरुण फुलबोयने हा महत्त्वाचा व मुख्य आरोपी असून त्याने अपहार करून मिळवलेले पैसे कोठे आहेत?, त्याने त्या पैशाची काय केले? यासंदर्भात पोलीस कसून तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी त्यांना गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना आलेल्या अनुभवावरून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथकाला विविध कल्पोक्त्या सांगून त्याची माहिती देऊन आरोपी अटक करण्यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यावरूनच पोलीस पथकाने डॉक्टरांचे वेश परिधान करून गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील महत्त्वा च्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळणार असून अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, पोलीस अमलदार युवराज गाडे, बाळासाहेब ओवांडकर, संतोष पांचाळ ,अर्जुन कारलेवाड यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.