नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वीकारला पदभार*

*नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वीकारला पदभार*


लातूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज (दि.22) पदभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

श्रीमती ठाकूर-घुगे यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. मराठवाड्यातील पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी जालना येथे निवासी उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बालमजूर प्रकल्पाच्या प्रमुख, औरंगाबाद येथे म्हाडाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा व सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त आदी पदांवर काम केले आहे. प्रशासनातील योगदानाबद्दल त्यांना प्रशासकीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

जिल्हधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीमती ठाकूर-घुगे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळे, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, निलंगाच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, लातूरच्या तहसीलदार शोभा पुजारी यावेळी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या