फिर्यादी पत्नीच निघाली आरोपी


       *चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीनेच संपवले."फिर्यादी पत्नीच निघाली आरोपी". पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य घटना उलगडली !!!*


              याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमधील जोडजवळा येथे राहणारी एका महिलेने "शेताच्या वादातून त्याच्या पतीचा नात्यातील इसमाने डोक्यावर कोयत्याने मारून खून केला." अशी तक्रार खुन करणाऱ्या इसमाच्या नावासह मयत इसमाच्या पत्नीने दिली होती‌. त्यावरून पोलीस ठाणे गातेगाव गुन्हा नोंद क्रमांक 108/2023 कलम 302 अन्वये नोंद करण्यात आला होता. आणि पोलिसांनी फिर्याद मध्ये नमूद आरोपी इसमास तात्काळ अटक केली होती.
                 खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर गुन्ह्याच्या कारणाची व इतर बाबींचा तपास करीत असताना मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत होती. यामुळे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यासंदर्भात पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते. त्याअनुषंगाने सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकास पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर ग्रामीण श्री. सुनील गोसावी हे वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. संयुक्त पथकाने सदर गुन्ह्यातील अटक आरोपी, फिर्यादी, साक्षीदार, यांच्याकडे अतिशय बारकाईने, विविध मुद्द्यावर सखोल विचारपूस केली. तेव्हा फिर्यादी,अटक आरोपी, साक्षीदार यांच्या सांगण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे समोर आले. 
                   
                    त्यावरून फिर्यादीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीनेच तिची आई व आणखीन दोन पुरुषाच्या मदतीने पतीचा खून केल्याचे सांगून करून मयत नामे हनमंत कटारे हा त्याची पत्नी पूजा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करीत होता. या सततच्या मारहाणीला/त्रासाला कंटाळून आई व इतर दोन पुरुषाच्या सहाय्याने पतीचा खून करून तो खून दुसऱ्या एका इसमानेच केल्याचा बनाव रचल्याचे कबूल केले.
                यावरून पोलीस पथकाने गुन्ह्यातील खरे आरोपी नामे

1) राजेंद्र विद्याधर नितळे, वय 54 वर्ष, राहणार बोरगाव, लातूर 

2) दत्तात्रय नागनाथ लोंढे, वय 55 वर्ष, राहणार जागजी तालुका जिल्हा उस्मानाबाद.

3) निर्मला पांडुरंग दयाळ, वय 50 वर्ष, राहणार ठोंबरे नगर, मुरुड
 तालुका लातूर.

4) पूजा हनमंत कटारे, वय 30 वर्ष, राहणार जोडजवळा, लातूर. (यातील फिर्यादी व मयताची पत्नी)

            यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.

             पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात गुन्ह्याचा बारकाईने तपास करून गुन्ह्यातील खऱ्या आरोपींना गजाआड केले आहेत.
             
            सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री‌.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात गातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी ज्ञानदेव सानप , स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी श्री. प्रवीण राठोड ,पोलीस अमलदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, राजेश कंचे, बंटी गायकवाड, प्रदीप चोपणे, शिरीष पाटील ,वाल्मीक केंद्रे, दशरथ गिरी, रामदास नाळे, जीवन राजगीरवाड, अतुल पतंगे, संजय मोरे यांनी केली आहे.गुन्हा घडल्याची तारीख 18/07/2023 असून गुन्ह्यातील नमूद 4 आरोपींना 21/07/2023 रोजी अटक करण्यात आलेली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या