ॐनम:शिवाय मंत्रामध्ये मानव कल्याणाची शक्ती आहे उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामीजी

:
ॐनम:शिवाय मंत्रामध्ये मानव कल्याणाची शक्ती आहे उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामीजी



औसा / प्रतिनिधी
संस्कृती प्रधान भारत देशामध्ये ३३ कोटी देवी-देवता असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे नाव सर्वश्रुत आहे. परंतु भगवान शंकराला देवाधिदेव महादेव
म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद हे चार वेद असून यजुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वराची आराधना करण्यासाठी
सोयीस्कर मार्ग म्हणून त्रिवेदी, द्विवेदी भक्तगणांना उपासना करण्यासाठी ॐनमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सर्व श्रेष्ठ ठरला आहे. म्हणून ॐनमः शिवाय हा मंत्र मानव
कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ आहे. असे प्रतिपादन उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामीजी यांनी केले. दिनांक १२ जुलै २०२३ रोजी हिरेमठ
संस्थांनच्या आषाढमासी वार्षिक महोत्सव व ८३ व्या शिवदीक्षा सोहळ्यानिमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. प्रारंभी आ. अभिमन्यू पवार
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धर्मसभेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या अमृतवाणीतून आशीर्वाचनांमध्ये बोलताना श्रीमद जगद्गुरु पुढे म्हणाले की, हिरेमठ
संस्थांनचे आधारस्तंभ गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी यांनी वीरशैव लिंगायत समाजाचे उत्कृष्ट संघटन बांधणी करून शिवदीक्षा सोहळ्यानिमित्त ईष्टलिंग
महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अखंडित परंपरा कायम राखली. हे कार्य संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज अत्यंत तळमळीने
करीत असून संस्थांनचे पिठाधिपती बालतपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज हा वारसा पुढे चालवीत असून भक्तगणाच्या कल्याणासाठी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम
आहे. भगवान शंकराच्या उपासनेचा मार्ग अत्यंत सुलभ असून फक्त पाणी आणि बेलपत्र अर्पण करून अनेक भक्तांनी आपल्या कल्याणाचा व मोक्षाचा मार्ग प्राप्त केला
आहे. त्यामुळे हिरेमठ संस्थांनच्या शिष्यगणांनी भक्तीचा सुलभ मार्ग अंगीकारणे आवश्यक आहे असेही श्रीमद जगद्गुरु यांनी स्पष्ट केले. मागील सात दिवसा पासून
जिंतूर येथील ष.ब्र. १०८ श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांनी संगीतमय शिवकथेच्या माध्यमातून भक्तगणांना मंत्रमुग्ध करून शिवभक्तीची ओढ निर्माण केली, तर
शिवभजन व शिव कीर्तनाच्या माध्यमातून आणि सिद्धांत शिखमणी तत्वामृत ग्रंथाचे पारायण अशा धार्मिक उपक्रमातून मानव कल्याणाचा मार्ग दाखविण्याचे हिरेमठ
संस्थांनचे कार्य उल्लेखनीय आहे. असे उज्जैन जगद्गुरु यांनी म्हटले. दिनांक १२ जुलै रोजी श्रीमती पार्वतीबाई गुरूपदप्पा कुलें, शंकरप्पा कुर्ले व इंजिनियर चंद्रशेखर
कुर्ले यांच्या परिवाराच्या वतीने अन्नदानाची सेवा करण्यात आली. हिरेमठ संस्थांनमध्ये महिनाभर अन्नदानाची सेवा शिष्यगण करीत असून दररोज हजारो भक्तगण
महाप्रसादाचा लाभ घेतात. शिवपाठ, मुखोद्गत करणाऱ्या अनेक महिलांचा तसेच महिला भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचाही श्रीमद जगद्गुरु यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमासाठी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषअप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सचिनअप्पा उटगे, नागेश ईळेकर, वैजनाथ शिंदूरे
यांच्यासह वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र
महास्वामीजी यांच्या सानिध्यात शिवदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला असून भक्तगणांनी शिव दीक्षा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शांतिवीर
लिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. कार्यक्रमासाठी हजारो महिला पुरुष व युवक शिष्यगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार हलकुडे यांनी
केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या