ट्युशन परिसरामध्ये मोबाईल स्नेचिंग, मुलींची छेडछाड करणारा गुंड 'एमपीडीए' खाली एक वर्षासाठी तुरुंगात स्थानबद्ध. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात कुख्यात गुंडाविरुद्ध चौथी मोठी कारवाई.
लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेमधील ही चौथी कारवाई असून सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी मंजूर केला आहे.
वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी आदेशित केल्यावरून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले कुख्यात गुंड व भाईगिरी करणाऱ्या, अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती एकत्रित करून त्यांचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने गांधीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचेमार्फत महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत ओमकार उमाकांत कसबे, वय 21 वर्ष, रा गांधी नगर, लातूर.याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्याच्या इतिहासामधील व श्री.सोमय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक म्हणून लातूर जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतरची चौथी मोठी कारवाई आहे.
एमपीडीए कायद्याचा वापर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून रोखण्यासाठी करण्यात येतो.
पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील धोकादायक इसम ओमकार उमाकांत कसबे, वय 21 वर्ष, रा गांधी नगर, लातूर. याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली कारवाई ही चौथी कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये एक, तसेच 2023 मध्ये तीन कुख्यात गुंडाविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
कुख्यात ओमकार उमाकांत कसबे, वय 21 वर्ष, रा गांधी नगर, लातूर. याचे विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये बळजबरीने, मारहाण करून मोबाईल हिसकावणे, मुलींची छेड काढणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र वापरणे, अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्याकडून सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक चे निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य कोले,पोलीस अंमलदार, संतोष खांडेकर, दामोदर मुळे, दयानंद आरदवाड, माजीद जागीरदार ,शिवाजी पाटील, यांनी नमूद आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी,लातूर यांच्याकडे मंजुरी पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी,लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावरून दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी लातूर येथील कारागृहात नमूद आरोपीची रवानगी करण्यात आलेली आहे.
*काय आहे एमपीडीए कायदा?*
महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ, पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.
सतत गुन्हेगारी कृत्य करणारे गुंड प्रवृत्तीच्या व एकापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या गुंड व्यक्तीं ची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) सारख्या कठोर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असून यानंतरही लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी वृत्तीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता सदरची कार्यवाही करण्यात येणार असून लातूर पोलीस कडून जिल्ह्यातील धोकादायक गुंड व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या कुख्यात इसमांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.