मुलाच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा माता - पित्याचा आरोप

 मुलाच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलीस 

पाठीशी घालत असल्याचा माता - पित्याचा आरोप






लातूर : औसा तालुक्यातील वडजी येथे अनैतिक  संबंधाच्या संशयावरुन आपल्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला असून या प्रकरणी भादा पोलिसांनी केवळ एका अल्पवयीन आरोपीला अटक केली असून इतर चार आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप मयत रंजीत  मुळे  याचे आई - वडील सौ. पद्मिनबाई तानाजी माळी  व तानाजी सोपान माळी यांनी लातुरात पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर  कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. 

औसा तालुक्यातील वडजी येथे दि. २९ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्रीनंतर रंजीत  तानाजी माळी याची शेतातील गोठ्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खून केल्याची कबुली देणाऱ्या शंकर शिवाजी मुळे या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा खून केवळ एका अल्पवयीन मुलाने करणे शक्य नाही. यामध्ये इतर आरोपी बबन कोंडीबा मुळे , विनोद राम पाटील, बाळू उत्तम जाधव, सौ.अंजना बबन मुळे , हणमंत बबन मुळे यांचाही समावेश असल्याचा आरोप मयताच्या माता - पित्यांनी  पोलीस अधीक्षक, औसा उपविभागीय पोलीस अधिकारी व भादा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. सौ. पद्मिनबाई  माळी  यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वरील आरोपींनी दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरात घुसून शिवीगाळ करीत माझ्या मुलाचे  रंजीतचे तुकडे - तुकडे करून खल्लास करण्याची धमकी दिली होती. मुलाला २०२४ वर्ष उजाडल्याचे पाहू देणार नाही,असेही धमकावले होते. पण आपण त्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. पण आरोपींनी धमकी खरी करून आपल्या निष्पाप मुलाचा बळी  घेतल्याचा आरोप केला. 

तानाजी माळी  यांनी यावेळी बोलताना पोलीस आरोपींना जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचे सांगितले. या खून प्रकरणाची रितसर  फिर्याद द्यायला गेल्यावरही भादा पोलिसांनी आपण इतर आरोपींची नावे  सांगण्याचा प्रयत्न केला असता आमचे काहीही ऐकून घेतले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपण हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याही कानावर घातला असून या प्रकरणातील उपरोक्त आरोपींवरही गुन्हे दाखल करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगितले. अजूनही आरोपींकडून  आपल्याला व आपल्या कुटुंबियांना, तसेच आम्हाला या प्रकरणी मदत करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आमच्यापैकी कोणाला काही झाल्यास, कोणावर हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न घडल्यास पोलिसांनी वर  नमूद आरोपींना जबाबदार धरावे, असे आपण निवेदनात नमूद केल्याचे  तानाजी माळी यांनी सांगितले. या प्रकरणी आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय नाही मिळाल्यास प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही पालकांनी यावेळी बोलताना दिला. याप्रसंगी नेताजी सोपान  माळी , सौ. सुनिता फुलचंद माळी यांची  उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या