· आदर्श आचारसंहिता, सी-व्हिजीलबाबत आढावा
· सी-व्हिजीलद्वारे प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेवून निपटारा करा
लातूर, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके, चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. याकरिता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केल्या.
आदर्श आचारसंहिता कक्ष आणि सी व्हिजील ॲप, मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था यासह निवडणूक आयोगामार्फत कार्यान्वित विविध ॲपच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, संगीता टकले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भरारी पथकांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास किंवा कोणताही गैरप्रकार होत असल्यास त्याची तातडीने दखल घेवून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. तसेच चेक पोस्टवर तैनात करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी करून रोकड, मद्य यासह इतर प्रतिबंधित बाबींची वाहतूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
राजकीय पक्ष, उमेदवारांना सभा, प्रचारासाठी विविध परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, परवानगीची पद्धत याबाबत सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींना माहिती देण्यात यावी. तसेच निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या विविध ॲपच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांनी आपले स्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर 100 मिनिटात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास संबंधित भरारी पथक, चेकपोस्ट वरील अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याबाबतचा अहवाल आपल्या नोडल अधिकाऱ्यांना द्यावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी सांगितले.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.