उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · सर्व आरोग्य केंद्रात उष्माघात विरोधी उपचार सुविधा उपलब्ध करावी · पेट्रोल पंप, मुख्य चौकांमध्ये पाणपोईची व्यवस्था करण्याच्या सूचना

 

संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

· सर्व आरोग्य केंद्रात उष्माघात विरोधी उपचार सुविधा उपलब्ध करावी

· पेट्रोल पंप, मुख्य चौकांमध्ये पाणपोईची व्यवस्था करण्याच्या सूचना




लातूर, दि. २५ : हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवसातील संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेवून उपाययोजना हाती घेण्यात याव्यात. या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच नागरिकांनीही उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घेवून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत प्रत्येक विभागाने कोणत्या दक्षता घ्यायच्या याबाबत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबसाहेब मनोहरे, निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एच. वडगावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सहायक अर्चना बिसोई यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबत माहितीचे सादरीकरण केले.


जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उष्माघात विरोधी औषधे याच्यासह आवश्यक सज्जता ठेवावी. यासोबतच उष्णतेच्या लाटेमध्ये नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, घरगुती उपाययोजना आदी बाबींची माहिती द्यावी. यासाठी आरोग्य विभागात कार्यरत आयुर्वेदिक डॉक्टरांची मदत घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


आरोग्य विभागाने उष्माघाताच्या अनुषंगाने उपचाराबाबत आवश्यक तयारी करावी. खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृतीवर भर द्यावा. जास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाय योजना करण्याच्या संबंधितांना सूचना द्याव्यात, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.


उष्णतेची लाट म्हणजे काय?


तापमानाच्या निकषानुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात ३० डिग्री सेल्सियस आणि समतल भागात ४० डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या भागात सलग दोन दिवस हंगामातीला सामान्य तापमानापेक्षा ४.५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे. यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास या भागात उष्णतेची लाट आहे हे समजून होणारे परिणाम टाळण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.


पाणपोईसाठी स्वयंसेवी संस्थाना आवाहन


  लातूर जिल्ह्यातील सर्व शहरे, निमशहरी भागात बाजारपेठेसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना उन्हाळ्यात स्वच्छ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा आणि जागोजागी पाणपोई उभ्या कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. तसेच सर्व पेट्रोलपंपांवर पाणपोईच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


*****



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या