लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लातूर लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी मतदान केंद्रांवर होणार बियांचे वाटप · प्रत्येक मतदारसंघात एक इकोफ्रेंडली, सखी, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

लातूर लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या


मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण


- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


· पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी मतदान केंद्रांवर होणार बियांचे वाटप


· प्रत्येक मतदारसंघात एक इकोफ्रेंडली, सखी, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र



लातूर, दि. ५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान २ हजार १२५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ५ मे रोजी सायंकाळी ६ पासून जाहीर प्रचार बंद झाला आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. मतदारांवर कोणत्याही आमिष, प्रलोभन दिले जात असल्यास किंवा कोणताही दबाव आणला जात असेल किंवा धमकावले जात असल्याचे निदर्शनास असल्यास अशा व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.


लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ७७ हजार ४२ इतके मतदार आहेत. २ हजार १२५ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी नियुक्त मतदान पथकांमध्‍ये ८ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी बीएलओ, चतुर्थश्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्‍य कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी असे ८ हजार २६५ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्‍याचप्रमाणे मतदान केंद्राच्‍या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आलेली आहेत. कायदा व सुव्‍यवस्‍थेसाठी बीएसएफ, एसआरपीएफ दलाच्या तुकड्या जिल्ह्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी मतदान केंद्रावर विशेष खबरदारी


उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मतदान केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, मतदारांच्या रांगेच्या ठिकाणी मंडप, मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोलीमध्ये मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या, पंख्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतदारांच्या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी प्रथमोपचार कीटसह आरोग्‍य कर्मचारी प्रत्‍येक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात ओआरएस पावडर आणि औषधी उपलब्ध राहतील. जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि ग्रामीण रुग्‍णालये यांच्‍या कार्यक्षेतत्रात रुग्‍णवाहीकेद्वारे आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.


एक हजार ६२ केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर वेब कास्टिंगद्वारे नजर


लातूर लोकसभा मतदारसंघातील ५० टक्के म्हणजेच जवळपास एक हजार ६२ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग केले जाणार असून याद्वारे संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक यांची मतदान प्रक्रियेवर नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र संनियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेला आहे.


मतदान पथके, मतदान यंत्र वाहतुकीवर राहणार लक्ष


लातूर मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी ६ मे रोजी मतदान पथके रवाना होणार आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी, भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, व्हीडीओ निगराणी पथके अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या ७९३ जीप, ३०१ बसेसची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व वाहनांच्या हालचालीचे जीपीएस प्रणालीद्वारे संनियंत्रण केले जाणार आहे. विशेषतः मतदान यंत्रे घेवून जाणारी वाहने आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या ताब्यातील मतदान यंत्रांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयातून निगराणी केली जाणार आहे.


सकाळी साडेपाच वाजता मॉक पोल, सातपासून प्रत्यक्ष मतदानाल सुरुवात


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदाना दिवशी ४ हजार २५० बॅलेट युनिट, २ हजार १२५ कंट्रोल युनिट आणि २ हजार १२५ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाणार आहे.


पर्यावरण रक्षणासाठी मतदान केंद्रांवर होणार वृक्षांच्या बियांचे वाटप


लोकसभा मतदारसंघात यावर्षी प्रथमच इकोफ्रेंडली मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या बियांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघात महिला नियंत्रित, युवा नियंत्रित आणि दिव्यांग नियंत्रित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे.


मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून १२ कागदपत्रे ग्राह्य धरणार


मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्राशिवाय आणखी १२ कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना अथवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत घेवून आल्यास मतदान करता येणार आहे. मात्र, यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.


मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात – पोलीस अधीक्षक


लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान ७ मे रोजी होणार असून प्रचाराचा कालावधी संपला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, यासाठी आवश्यक ३ हजार ७६८ अंमलदार, २४२ अधिकारी आणि १ हजार ८०० होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये अकोला, सोलापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच बीएसएफची एक तुकडी आणि आंध्र प्रदेशातील राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्याही जिल्ह्यात आलेल्या आहेत. समाज माध्यमातून मतदारांना आमिष दाखविणे, त्यांच्यावर दबाव आणण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी सायबर सेल काम करीत आहे. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.


            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आदर्श आचारसंहिता कक्षाच्या कार्यवाहीची माहिती दिली. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी निवडणूक सज्जतेबाबत माहिती दिली.


****



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या