खाजगी मालमत्तावरील होर्डिंग काढण्यासाठी रविवारची मुदत
सार्वजनिक ठिकाणचीहोर्डिंग तात्काळ काढून घेण्याचे मनपाचे आवाहन
गुन्हे दाखल करण्याचा इशारा
लातूर/प्रतिनिधी: शहरात विविध ठिकाणी अवैध होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.हे होर्डिंग्स रविवार दि.१९ मे पर्यंत काढून घ्यावेत अन्यथा मनपाच्या वतीने ते काढण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
मुंबईत घाटकोपर येथील येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर मनपाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.त्यामुळे मनपाने या सूचना केल्या आहेत.ज्या खाजगी मालमत्तांवर मोठमोठे होर्डिंग लावलेले आहेत ते होर्डिंग रविवार दि.१९ मे पर्यंत स्ट्रक्चरसहीत काढून घ्यावेत.सोमवारी असे होर्डिंग दिसून आले तर मालमत्ता धारक व एजन्सी धारकांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
सार्वजनिक मालमत्तां वर लावण्यात आलेले होर्डिंगही तात्काळ काढून घेण्याचे निर्देश मनपाने दिले आहेत.ही होर्डिंग संबंधितांनी काढली नाहीत तर मनपाकडून ते काढले जातील.त्यासाठी होणारा खर्च संबंधित एजन्सी कडून वसूल करून एजन्सी धारकावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
कांही जाहिरात एजन्सीनी परवाना नूतनीकरणीसाठी मनपाकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यात त्रुटी असल्यामुळे असे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत.सद्यस्थितीत पालिकेकडे एकही प्रस्ताव प्रलंबित नाही.काही एजन्सीनी जाहिरात शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्या आहेत परंतु त्या पावत्या जुन्या आहेत. संबंधितांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही.त्यामुळे त्या होर्डिंग विनापरवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजकांमध्ये उभारण्यात आलेल्या युनिपोल बाबतही पालिकेकडे काही तक्रारी आल्या आहेत.या संदर्भात पालिकेने कंत्राटदारास नोटीस देऊन युनिपोलची साईज व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय/तंत्रनिकेतनचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्यास कळविले आहे.
अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या जागांमध्ये होर्डिंग लावण्यात आले आहेत.हे होर्डिंगही तात्काळ काढून घेण्याचे निर्देश मनपाने दिले आहेत.होर्डिंगमुळे एखादी दुर्घटना किंवा अपघात होऊन विविध जीवित व वित्तहानी झाली तर संबधित शासकीय विभागाची जबाबदारी राहिल.
शहरात होर्डिंग उभा करावयाचे असतील तर त्यासाठी परवानगी घ्यावी असे मनपाने सूचित केले आहे.ज्या व्यावसायिकांना होर्डिंगसाठी परवानगी आवश्यक आहे त्यांनी जागा मालकाचे मालकाचा बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र,१०० रुपयाच्या बॉंडवर संमती पत्र,जागा मालकाने चालू वर्षाचा कर भरल्याची पावती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय/शासकीय तंत्रनिकेतनचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट,होर्डिंगचे स्टील डिझाईन रिपोर्ट, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय अभियंत्यांचा अहवाल व बेबाकी प्रमाणपत्र सादर करून पालिकेकडून रीतसर परवाना घ्यावा.
मनपाने केलेल्या सूचनांची दखल घेऊन संबंधितांनी अनधिकृत होर्डिंग तात्काळ काढून घ्यावेत.एखादी दुर्घटना झाली तर त्यासाठी संबंधित एजन्सी व मालमत्ताधारकास जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशारा पालिकेने दिला आहे.
शुक्रवार दि.१७ मे पर्यंत पालिकेने १६ होर्डिंग निष्कासित केल्या असून क्षेत्रीय कार्यालया मार्फत दोन गुन्हे नोंद करण्यात आले असल्याची माहिती मनपा उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.