इतर मतदारसंघात निधी येतो मग लातूरला का नाही ?
डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सवाल
लातूर/प्रतिनिधी: मागील काळात विकासकामांसाठी निधी न आल्यामुळे लातूर शहर भकास झाले आहे.जिल्ह्यातील इतर मतदारसंघात विकास कामांसाठी निधी येतो मग लातूर शहरालाच निधी का मिळत नाही ? असा सवाल भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी उपस्थित केला.
गुरुवारी सायंकाळी पाच नंबर चौक परिसरात झालेल्या सभेत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर बोलत होत्या.या सभेस शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी अध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे,महिला मोर्चाचा शहराध्यक्ष रागिनीताई यादव,रवी सुडे,दिग्विजय काथवटे, गणेश गोमसाळे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाने यांच्यासह गणेश गवारे,निखिल गायकवाड, देवाभाऊ साळुंके,राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, हवा पाटील,बंटी बोमणे, गणेश बोमणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.
चाकूरकर म्हणाल्या की, मागील १५ वर्षात लातूर शहरात विकास कामे झाली नाहीत. शहरातील मूलभूत समस्या सुटल्या नाहीत. नागरिकांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत.आजही सामान्य नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागते.याच काळात जिल्ह्यातील इतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आला, विकासकामे झाली.लातूरमध्ये मात्र विकासनिधी आला नाही. हा निधी का आला नाही ? याचा विचार लातूरकर जनतेने करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
लातूरच्या नेतृत्वाचे शहराच्या विकासाकडे लक्ष नाही.प्रवासी आमदार लातूरकरांना आजवर मिळाला होता.आता मात्र जनतेने महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लातूरकरांसाठी निवासी आमदार मिळणार असल्याचा विश्वास डॉ.
चाकूरकर यांनी व्यक्त केला. मी लातूरकरांची लाडकी बहीण आहे,असेही त्या म्हणाल्या.
शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी सांगितले की,मागे जे झाले ते भविष्यात दिसणार नाही.शहराचा विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले की,स्थानिकांना प्राधान्य द्या असे आमदार सभांमध्ये बोलताना म्हणतात परंतु स्वतःची कामे मात्र स्थानिक युवकांना न देता पुणे-मुंबईच्या कंपन्यांना देतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप करणारे लातूरचे काम मुंबईला का देतात ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांनी स्थानिक आमदारांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे विकास निधीसाठी कधीही मागणी केली नसल्याचे सांगितले.शहरातील कचरा समस्या सोडविण्यात अपयश आल्याबद्दल अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले. शहरातून फिरताना नाकाला रुमाल लावावा लागतो,असे ते म्हणाले.
भाजप सरकारने दिलेल्या निधीतून नगरसेवकांनी शहरात विविध विकास कामे केली परंतु विद्यमान आमदार नगरसेवकांच्या कामाचेही श्रेय लाटत असल्याचा आरोप गणेश गोमसाळे यांनी आपल्या मनोगतात केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी शहरातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आमदार बदलण्याची गरज असल्याचे सांगितले.
या सभेत बंटी बोमणे,गणेश बोमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला युवाशक्ती मिळाली असल्याचे सांगून या भागातील विकासासाठी त्यांची मदत होणार असल्याचा विश्वास डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.
या सभेस शहर मतदारसंघातील नागरिक, भाजपा महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.