निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येकाने आपली जबाबदारी काळजीपूर्वकपणे पार पाडावी-विभागीय आयुक्त दिलीप गावडे • विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा • मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना



निवडणूक प्रक्रियेत सहभागी प्रत्येकाने आपली जबाबदारी काळजीपूर्वकपणे पार पाडावी-विभागीय आयुक्त दिलीप गावडे


• विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

• मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना





लातूर, दि. ०८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वकपणे काम करावे, अशा सूचना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.


जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, श्री. टेकाळे, सुरेश बेदमुथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्यासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मतदानसाठी नियुक्त पथकांनी विशेषतः गृह मतदानासाठी घरोघरी जाणाऱ्या पथकांनी मतदानाच्या गोपनीयतेच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी. या पथकातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना याबाबत योग्य प्रशिक्षण दिले जावे. तसेच मतदान केंद्रामध्ये कोणीही मोबाईल घेवून प्रवेश करणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान केंद्रातील मतदान करतानाचे चित्रीकरण केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या.


निवडणूक प्रचारात, तसेच मतदानाचा जाहीर प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी, तसेच मद्य, पैसे याचे वाटप होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांच्या माध्यमातून मोहीम स्वरुपात तपासणी करून आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त यांनी केल्या. मतदार जागृतीसाठी लातूर जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ सारख्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ग्रामीण भागात पथके स्थापन करून जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवमतदार, महिला यांच्यामध्ये जागृती करून त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. लोकसभेतला राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा मतदान केंद्रावर विशेष पथके नेमून मतदार जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यात सहा ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. यासोबतच पोलीस दलामार्फत अचानक तपासणी मोहीम राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. यासोबतच अवैध मद्यसाठे जप्त करण्यासाठीही शोध मोहीम राबविण्यात आली आहे. पिस्तुलसह विविध शस्त्रे तपासणी मोहिमेमध्ये जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच मतदान कक्ष, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.


उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन


 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वपीठिका तयार करण्यात आली आहे. या पूर्वपिठिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, सध्याची मतदार संख्या, मतदान केंद्र संख्या, निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क क्रमांकांचा समावेश या पूर्वपीठिकेत करण्यात आलेला आहे.

**

Collector & District Magistrate, Latur

Latur Police Department

Chief Electoral Officer Maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या