राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे भव्य थॅलेसिमिया जनजागृती मोहीम
हासेगाव (ता. औसा) – जागतिक फार्मसी दिन आणि राष्ट्रीय सेवा योजना दिन या दुहेरी निमित्ताने, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव येथे थॅलेसिमिया जनजागृती व मोफत थॅलेसिमिया रक्त तपासणी शिबीर भव्य उत्साहात पार पडले.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या शिबिरात तब्बल ८५ विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसिमिया तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागात दुर्मिळ आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.
हा उपक्रम श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुढाकाराने राबविण्यात आला. यामध्ये अनेक प्रतिष्ठित संस्थांचा सक्रिय सहभाग होता
डॉ. भालचंद्र रक्तपेढी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.), विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम).
कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. योगेश निटुरकर आणि डॉ. योगेश गावसाने यांनी केले. संपूर्ण उपक्रमाचे उत्कृष्ट समन्वयन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कराड श्रीनिवास यांनी केले.
शिबिरादरम्यान डॉ. योगेश निटुरकर सरांनी उपस्थितांना थॅलेसिमियाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की: थॅलेसिमिया हा अनुवंशिक रक्तरोग आहे, ज्यामध्ये शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. परिणामी रक्तक्षय (अॅनिमिया) होतो आणि शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
लवकर तपासणी अत्यावश्यक आहे, कारण आई-वडील दोघेही वाहक (carrier) असल्यास पुढील पिढीत गंभीर प्रकारचा थॅलेसिमिया होऊ शकतो.
लग्नापूर्वी रक्त तपासणी करून हा आजार पुढील पिढीकडे जाण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखता येतो.
गंभीर रुग्णांना नियमित रक्तसंचार व लोह-नियंत्रण औषधोपचार आवश्यक असतात, तसेच काही रुग्णांसाठी हाडमज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) हा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो.
या उपक्रमाला श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भीमाशंकरअप्पा बावगे, सचिव मा. वेताळेश्वर बावगे यांनी
कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक नंदकिशोर बावगे आणि लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नितीन लोणीकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामीण पातळीवर थॅलेसिमिया जनजागृतीसाठी उचललेले हे पाऊल आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मुक्तापुरे वैभवी आणि कु. टरके निकिता यांनी केले, तर डॉ. संग्राम देशमुख सर यांनी आभारप्रदर्शन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.