औंढा नागनाथमधील घोषित कंटेनमेंट झोन आता प्रतिबंधमुक्त
हिंगोली, दि.25: औंढा नागनाथ येथील गोबाडे गल्ली भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून गोबाडे गल्ली, सिध्दार्थ नगर, सुतार गल्ली, नागेंद्र गल्ली, सोनार गल्ली हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे 9 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन एकूण 571 घराची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3 हजार 775 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी मध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
त्यामुळे घोषित केलेल्या कंटेनमेंट झोनचा कालावधी 22 जून, 2020 रोजी संपल्याने या परिसरातील व्यक्तींसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त केले आहेत.
****
आरबीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व बँकांचे कामकाज सुरु करण्याचे आदेश
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली,दि.25: सर्व बँकांचे कामकाज हे आरबीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहे. त्यानुसार खातेदारांसाठी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बँकेत येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एक ते दोन मीटर अंतरावर गोल-चौकोन आखण्यात यावेत तसेच खातेदार आखलेल्या गोल, चौकोनामध्येच उभे राहतील याची दक्षात घेण्यात यावी. खातेदारांना टोकन देण्यात यावेत व टोकन नुसारच व्यवहार करण्यात यावे. टोकननुसार नंबर आलेल्या खातेदारांना माहिती होण्यासाठी पब्लीक अनाऊन्समेंट सिस्टीम बसविण्यात यावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क व सॅनीटायझरचा वापर करण्याबाबत सर्व संबंधितांना अनिवार्य करावे. तसेच त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकावेळी बँकेमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तीस प्रवेश देण्यात येवू नये. दररोज कामावर येणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच खातेदारांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याची व्यवस्था व साबणाची व्यवस्था करुन पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परिसिमेचे तंतोतंत पालन करुन बँकेमध्ये व बँकेच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. तसेच जागोजागी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावण्यात यावे.
या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध आहे, असे मानण्यात येईल.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.