लातूरच्या सोनवणे पुतळ्यासमोरुन अशी वाहतेय नाली,स्वच्छतेची ऐशी की तैशी
लातूर,दि.२५ः लातूरमधील अत्यंत रहदारीचा भाग असलेल्या गुळमार्केट,माणिकराव सोनवणे पुतळा चौकात गेली आठवडाभरापासून कोंडलेल्या नालीमुळे ते घाण पाणी चक्क चौक-रस्त्यातून वाहतेय त्यामुळे पादचार्यांना त्रास तर होतोय शिवाय दुर्गंधी निर्माण होवून अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असताना मनपाचा सफाई विभाग कोठे गायब झाला आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
लातूर शहर महानगर पालिकेने गेली दहा वर्षात स्वच्छतेचे विभाग आणि राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत,त्याचा मनपाला हल्ली विसर पडला आहे की काय हे गुळमार्केट माणिकराव सोनवणे पुुतळा चौकात दिसून येते आहे, या चौकात कामदार रोड, तसेच दूरसंचार कार्यालय,शाहू महाविद्यालय,चंद्रनगर भागातून येणार्या नाली सायकल दुकानाजवळ कोंडलेली आहे.या नाल्यामधून शौचासाच्या पाण्यासह दुर्गंधीयुक्त सांडपाणीही वाहते.या चौकात ती नाली कोंडल्याने पाणी सरळ चौकातून वाहात आहे.सध्या पावसाळा आहे,हे रोगराईचे दिवस आहेत.या भागातून आडत लाईन,गंजगोलाई,गुळमार्केट,नांदेड रोड कडे जाणार्या नागरिक वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे,शिवाय चौकात, बियाणे,खते,शेतीविषयक अवजारांची दुकाने आहेत. चौकात एक दारुचे दुकान असल्याने अनेकांचा येथे राबतआहे.हा भाग वर्दळीचा आहे. विशेष म्हणजे या चौकात सिग्नल आहे, त्यामुळे तिथे पोलिसांना थांबून या घाणीचा वास घेत वाहतूक नियंत्रण करावे लागते आहे.सिग्नल पडल्यास वाहनचालकांना या घाणीचा वास घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.
अशा या वर्दळीच्या चौकातून लातूरच्या मनपाचे अधिकारी,कर्मचारी आणि पदाधिकारी दिवसातून अनेकवेळा जात असतील.शिवाय या प्रभागात स्वच्छता निरीक्षक असतो,त्यांना ही घाण,तुंबलेली नाली दिसत नसत नाही का, कोणीतरी तक्रार केल्यास कामे करायचे ही चुकीची प्रथा पडत आहे.ज्यांची जी जबाबदारी आहे ती ते का पार पाडत नाहीत,असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता पावसाळा सुरु झाला असून, त्यात या चौकातील घाणीतून जाणे -येणे करणे म्हणजे साथ रोगाचे आमंत्रण ओढवून घेण्यासारखे आहे,तेव्हा संबंधित आरोग्य यंत्रणेने याची दखल घेवून ही तुंंबलेली नाली त्वरीत दुरुस्त करुन,चौकातून होणारा घाण पाण्याचा विसर्ग बंद करावा अशी मागणी होत आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.