पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून मनपास १५ कोटी च्या विकास निधी वापराचा मार्ग मोकळा
२ वर्षांपासून अखर्चित राहिलेल्या निधी अंतर्गत शहरातील विकास कामे मार्गी लागणार
महापौरांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
राज्यातली सर्वच महानगरपालिका प्रमाणे लातूर शहर महानगरपालिकेस राज्य शासनाच्या वतीने विविध योजना मधून विकास कामे राबविण्यास निधी उपलब्ध करून दिला जातो. सन २०१७-१८ साली मूलभूत सोयी सुविधा विकास योजना अंतर्गत १० कोटी तसेच विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी लातूर शहर महानगरपालिका प्राप्त झालेला होता परंतु तत्कालीन परिस्थितीत निर्णयाचा अभावामुळे सदर निधी अखर्चित राहिलेला होता. २ वर्षे उलटून जाऊनही निधी खर्च न झाल्याने राज्य शासनाने सदर निधी वापराकरिता स्थगिती दिलेली होती. परंतु लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर दिनांक २० जानेवारी २०२० रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने या निधीअंतर्गत शहरातील विकास कामांची निवड केलेली होती. सदर निधी वापरास मंजुरी मिळवून देण्याची विनंती महापौर व उपमहापौर यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या कडे केली होती. याच अनुषंगाने पालकमंत्री यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून १५ कोटी रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्याकरिता मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळवून दिल्याने या निधी अंतर्गत निवडण्यात आलेले विकास कामे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लातूर महानगरपालिका द्वारे सदर निधी शहरातील विविध विकास कामांवर खर्च केला जाणार असल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
सुमारे २ वर्ष अखर्चित राहिलेला निधी वापरास मुदतवाढ मिळवून दिल्यामुळे शहर विकास गती प्राप्त होणार असल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे मनपा पदाधिकारी, नगरसेवक तथा लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.