हिंगोली जिला वार्ता : लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद
हिंगोली,दि.15: इमामोद्दीन शेख
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी शुक्रवार, दि. 17 जुलै, 2020 रोजी दुपारी 03.00 वाजता संवाद साधता येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरीता जिल्हा प्रशासन काय करत आहे ? येणाऱ्या कालावधीत नागरिकांनी कोणत्या निर्देशाचे पालन करावयाचे आहे, आपात्कालीन कालावधीत नागरिकांना कोणत्या माध्यमातून मदत मिळेल, याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ’ या फेसबुक पेजच्या कंमेन्ट बॉक्स च्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असून जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालुका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****
हिंगोली नगर परिषद हद्दीतील बाजारपेठाकरीता सुधारीत वेळापत्रक निश्चित
हिंगोली, दि.15 : हिंगोली नगर परिषद भाग 5 ते 10 जुलै या कालावधीत पूर्णत: बंद करुन संचारबंदी करण्यात आली होती. त्यानुसार दि 10 जुलै, 2020 रोजी संचारबंदी कालावधी संपत असून दि. 11 जुलै, 2020 पासून शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाजाराच्या वेळापत्रकाप्रमाणे बाजार चालू केल्यास नागरिकांची गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य असल्याने बाजाराच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.
दिनांक 15 जुलै-किराणा दुकान, स्वीट मार्ट सकाळी 08.00 ते दुपारी 01.00, दि. 16 जुलै रोजी स्टेशनरी, कापड, इलेक्ट्रॉनिक, सर्व गाड्यांचे विक्री दालने, वर्क शॉप, स्पेटर पार्टस, भांडी दुकाने, सलून, ज्वेलरी इत्यादी सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, दि. 17 जुलै 2020 रोजी भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, स्वीट मार्ट, मांस मच्छी इत्यादी सकाळी 06.00 ते दुपारी 01.00, पर्यंत.
बाजाराच्या वेळेत बदल करण्यात आल्यानुसार नागरिकांनी तसेच संबंधित आस्थापना मालकांनी दिनांक 15 ते 17 जुलै पर्यंत या वेळापत्रकाचे पालन करावे, दिनांक 18 जुलैपासून सर्व बाजार पेठ पूर्ववत चालू राहतील. त्यानुसार हे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, कळमनुरी, तहसीलदार कळमनुरी, मुख्याधिकारी नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
*****
परिचर विनोदकुमार राठोड यांना रुजू होण्याचे आवाहन
हिंगोली,दि.15: औंढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बाजार येथील परिचर, विनोदकुमार श्रीराम राठोड, हे कार्यालयात दि. 18 मे, 2018 पासून अनधिकृत अनुपस्थित असल्याने त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1964 चे नियम 06 (02) नुसार दोषारोप प्रपत्र 01 ते 04 सह कारणे दाखवा नोटीस निर्गमित करण्यात आलेली होती. त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊनही खुलासा सादर न केल्याने त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी आदेशीत करण्यात आली होती.
विभागीय चौकशी अंती त्यांच्याविरुध्द ठेवण्यात आलेले सर्व दोषारोप सिध्द झाल्याने त्यांना पुनश्च : अंतिम संधी म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 चे नियम 06 (10) नुसार जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये ? अशा आशयाची अंतिम कारणे दाखवा नोटीस निर्गमित करण्यात आलेली होती. मात्र तरीही त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. तसेच पंचनामा दरम्यान ते दिलेल्या पत्यावर आढळून आले नाहीत.
यामुळे विनोदकुमार श्रीराम राठोड, परिचर , प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बा. ता. औंढा यांना अंतिम संधी देण्यात येत असून त्यांना कळविण्यात येते की, आपण आठ दिवसांमध्ये सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क करावा अन्यथा आपणास जिल्हा परिषद सेवेची आवश्यकता नाही असे समजून जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी केले आहे.
*****
कोरोना विरुध्दच्या लढाईत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचा सहभाग
हिंगोली,दि.15: कोविड-19 कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग हिंगोली यांच्या मार्फत महत्वाची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या लोकांकरीता विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. सदर विलगीकरण कक्षामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या पत्रान्वये कोविड-19 च्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष काम वाटप समिती हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना केअर सेंटर वसमत, कोरोना केअर सेंटर औंढा (ना.) कोरोना केअर सेंटर कळमनुरी, कोरोना केअर सेंटर सेनगाव, कोरोना केअर सेंटर हिंगोली डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल औंढा रोड, हिंगोली, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या एकूण सात कोरोना केअर सेंटरला सेवा देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना एकूण सात सेवा सोसायट्यांना काम वाटप करण्यात आले. एकूण 67 बेरोजगार सोसायट्यांपैकी कार्यरत 49 सेवा सोसायटी आहेत. तर सेवा सोसायट्यांना माहे ऑगस्ट-2019 पासून ते आजपर्यंत एकून 27 लाख 48 हजार 228 रुपये रक्कमेचे काम वाटप करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.